अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गावाचे नेतृत्व सक्षम असल्यास विकासाला चालना व योग्य दिशा मिळते. राजकारणात बदल घडत असतात.

नव्याने नेतृत्व उदयास येऊन नवीन कार्यकर्ते घडत असतात. मात्र गावाचा विकास हेच ध्येय समोर ठेऊन प्रत्येकाने कार्य करण्याची गरज आहे. सरपंचांनी आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपल्या असून, सर्व हेवेदावे सोडून गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन पद्मश्री पोपट पवार यांनी केले.

नेप्ती (ता. नगर) येथे साई संजीवनी प्रतिष्ठान व नेप्ती ग्रामस्थांच्यावतीने पद्मश्री पोपट पवार व आमदार निलेश लंके यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात पद्मश्री पवार बोलत होते. बबनराव फुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, माजी पंचायत समिती सदस्य देवा (किसन) होले, सरपंच सुधाकर कदम, माजी सरपंच संजय जपकर, उपसरपंच संभाजी गडाख, वसंतराव पवार, शिवाजी होळकर, दिलीप होळकर, राजेंद्र होळकर, दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते.

पद्मश्री पवार म्हणाले, नेप्ती व हिवरेबाजारचे सलोख्याचे संबंध असून, एक ऋणानुबंध निर्माण झाला आहे. गावासाठी अनेक विकासात्मक योजना असून, या योजना कार्यान्वित करुन त्याची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. नुकतेच गावात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतून चांगला अनुभव मिळाला. एक रुपयाही खर्च न करता गावात 90 टक्के मतदान झाले. निवडणुकीत बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त झाल्या, तर आत्मविश्वास देखील वाढला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.