‘त्या’ गावात शाळा सुरू करण्यास परवानगी मिळावी

‘त्या’ गावात शाळा सुरू करण्यास परवानगी मिळावी

पद्मश्री पोपटराव पवार यांचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांना निवेदन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरु करण्याबाबत पद्मश्री तथा आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री बच्चु कडू यांना निवेदन पाठविले आहे. यात करोनाचा शिरकाव न झालेल्या तसेच करोनामुक्त झालेल्या गावात शाळा सुरू करण्याची परवानगीची मागणी करण्यात आली आहे.

हिवरे बाजार (ता. जिल्हा नगर) या आदर्श गावात लोकांचा सहभाग व सामाजिक शिस्त असल्यामुळे हे गावा राज्यातील पहिले करोनामुक्त गाव झालेले आहे. त्याच अनुभवातून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व ग्रामपंचायत यांनी स्वत:च्या जबाबदारीवर 15 जूनपासून इयत्ता 5 ते 7 वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व इयत्ता 8 ते 10 यशवंत माध्यमिक विद्यालय सुरु केलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी अतिशय आनंदी आहेत.

गेली 8 दिवस कुठल्याही प्रकारची अडचण जाणवली नाही. हिवरे बाजार हे गाव 15 मे रोजी करोनामुक्त झाले. दरम्यान, 16 ते 30 मे या कालावधीत प्रत्यक्षात शाळा सुरु करणेबाबत विद्यार्थी व पालक सर्वे करून प्रत्यक्षात चर्चा केली आणि त्यांचे मत जाणून घेतले. त्यातुन असे लक्षात आले, विद्यार्थी लिखाण, वाचन विसरूनच गेलेले आहेत. यातून ग्रामीण भागात ऑनलाईन अभ्यासक्रमात इंटरनेट व त्याअनुषंगिक इतर सोयीसुविधा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे आणि त्यातून मुलांचे व पर्यायाने त्या कुटुंबाचा भविष्यकाळच अंधकारमय होण्याची भीती आहे.

आपल्याला करोना बरोबरच रहायचे आहे, हे लक्षात आल्यामुळे प्रथमतः शिक्षकांची तदनंतर पालकांची व ग्रामपंचायत करोना सुरक्षा समितीची बैठक घेऊन हिवरे बाजार येथील विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांनी करोनाविषयक जबाबदारी स्वीकारली आणि शिक्षकांनी अध्यापनाचे काम करण्याची जबाबदारी स्वीकारून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जी गावे, वाडया वस्त्या व पाडे यामध्ये करोनाचा शिरकाव झालेला नाही. तसेच ज्या गावात करोना आला परंतु उत्तम नियोजनातून गाव करोना मुक्त गाव करण्यात आली, अशा ठिकाणी करोनाविषयक जबाबदारी पालक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांनी घेतल्यास जिल्हा परिषदेच्या संबिधीत विभागामार्फत परिस्थितीची खातरजमा करून शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com