पाच नंबर साठवण तलाव तो झ्याकी है ! - ना. आशुतोष काळे

पाच नंबर साठवण तलाव तो झ्याकी है ! -  ना. आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

5 नं. साठवण तलावाला ज्यावेळी तांत्रिक मान्यता मिळाली त्यावेळीच साठवण तलावाचे काम होणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. फक्त प्रशासकीय मंजुरीची प्रतिक्षा होते. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने जास्त प्रतिक्षा पाहू दिली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 5 नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 131.24 कोटी निधीची प्रशासकीय मंजुरी आघाडी सरकारकडून मिळविली असली तरी 5 नं. साठवण तलाव तो झ्याकी है !, आगे आगे देखो होता है क्या ! अशा शायरी अंदाजातून कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सुतोवाच ना. आशुतोष काळे यांनी केले.

5 नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 131.24 कोटी निधीची प्रशासकीय मंजुरी मिळवून आणल्याबद्दल कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ना. काळे म्हणाले, माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात 4 नं. साठवण तलावासाठी 2 कोटी निधी आणला मात्र काम होवू शकले नाही. महिला भगिनींना होणार्‍या त्रासाचे गांभीर्य ओळखले होते. त्यामुळे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवयाचाच असा मनाशी निश्चय करून त्यासाठी 2019 च्या निवडणुकीपूर्वी आणि निवडून आल्यावर देखील प्रामाणिक प्रयत्न करीत होतो.

त्या प्रयत्नाचे फलित आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या अनमोल सहकार्यातून महाविकास आघाडी सरकारकडून 5 नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 131.24 कोटी निधीची प्रशासकीय मंजुरी मिळविली. पाणी प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द पूर्ण होत आहे. याचा विशेष आनंद होत आहे. कोपरगाव शहरात विकासाचे अनेक प्रश्न बाकी आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्याप्रमाणे मार्गी लावला त्याप्रमाणे ही राहिलेली विकासकामे देखील येत्या काही महिन्यात पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.

याप्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, पद्माकांत कुदळे, विजय बंब, कैलास ठोळे, धरमचंद बागरेचा, डॉ. अजय गर्जे, डॉ. वर्षा झवर, सौ. सुधा ठोळे, अ‍ॅड. शंतनू धोर्डे, सुनील गंगूले, कलविंदरसिंग दडीयाल, विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, भरत मोरे, डॉ. तुषार गलांडे, डॉ. अतिष काळे, सुनील शिलेदार, रमेश गवळी, फकीर कुरेशी, प्रसाद नाईक, राजेंद्र बंब आदींसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अ‍ॅड. विद्यासागर शिंदे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन रमेश गवळी तर आभार शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी मानले.

Related Stories

No stories found.