डाळिंबाला तेल्या, सोयाबीन दुबार, मकाला लष्करी अळी, खते टंचाईने शेतकरी संकटात
सार्वमत

डाळिंबाला तेल्या, सोयाबीन दुबार, मकाला लष्करी अळी, खते टंचाईने शेतकरी संकटात

Arvind Arkhade

पिंपरी निर्मळ|वार्ताहर|Pimpari Nirmal

मान्सूनच्या पावसाचे चालू वर्षी दमदार आगमन झाले. मात्र सातत्याचे ढगाळ हवामानामुळे डाळिंब फळबागांवर तेल्या, टिपका, फळगळ रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळबागा धोक्यात आल्या तर खराब बियाण्यांमुळे खरिपाच्या दुबार पेरण्या कराव्या लागल्या. उगवलेली मका लष्करी अळीच्या कचाट्यात सापडली आहे.

दुसरीकडे उभ्या पिकांना आवश्यक खतेही मिळत नसल्याने शेतकरी भिषण संकटात सापडला आहे. सरकारचे मात्र करोनाच्या नावाखाली शेतकर्‍यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने चांगला पाऊस होऊनही चालू वर्षाचा खरीप वाया जाण्याची भीती शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.

खासगी बियाणे कंपन्यासह शासनाच्या महाबीज कंपनीचेही सोयाबीनचे बियाणे खराब निघाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सोयाबीन उगवले नाही. शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला. घरगुती बियाणे घेऊन दुबार पेरणीची वेळ शेतकर्‍यांवर आली. सोयाबीनबरोबर मका पिकाचीही पेरणी मोठ्या प्रमाणात झाली. मात्र उगवलेल्या मका पिकावर सुरुवातीपासूनच लष्करी अळीने हल्ला केला.

पिकांना आवश्यक असलेल्या रासायनिक खतांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. पिकांच्या वाढीच्या अवस्थेत आवश्यक असणारी खते न मिळाल्याने पिकांची वाढ कमी झाल्याने उत्पन्नात मोठी घट येण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. शासनाकडून या सर्वच बाबींवर कोणत्याच उपाययोजना होताना दिसत नाहीत.

या उलट फळबागांच्या पीक विम्याच्या परताव्याचे निकष बदलून एकतर्फी विमा कंपनीच्या हिताचे केल्यामुळे शेतकर्‍यांपुढील अडचणीत वाढ होणार आहे. एकंदरित चालू वर्षी पाऊस जरी चांगला पडत असला तरी शासनाच्या करोना संकटांच्या आडून शेतकर्‍यांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे चालू वर्षात शेती क्षेत्राच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता तज्ञाकडून व्यक्त होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com