डाळिंब बागांवर तेल्या रोगाची सक्रांत
सार्वमत

डाळिंब बागांवर तेल्या रोगाची सक्रांत

300 हून अधिक हेक्टर क्षेत्रातील बागा बाधित; अनेकांवर कुर्‍हाड चालविण्याची वेळ

Arvind Arkhade

राहाता|Rahata

राहाता तालुक्यातील चोळकेवाडी, पिंप्री निर्मळ परिसरातील डाळिंब बागांवर तेल्या रोगाची संक्रांत आल्याने सुमारे 300 हेक्टरहून अधिक बागा बाधित झाल्या आहेत. शेतकर्‍यांनी खर्च केलेले लाखो रुपये वाया गेले तर या बागांपासून मिळणार्‍या कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागले आहे. या बागांवर कुर्‍हाड चालविण्याची वेळ आल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

परिसरात 700 ते 800 हेक्टर डाळिंब बागांची लागवड झाली. चांगले उत्पन्नही मिळत होते. मागील दोन वर्षांपासून परिसरात तेल्या रोगाचा शिरकाव झाला. थोडी झळ बसली मात्र चालू हंगामात या परिसरात तेल्या रोगाने मोठा उच्छाद मांडला. 300 हून अधिक हेक्टरवरील काढणीस आलेल्या डाळिंब बागांची फळे या रोगाने होत्याची नव्हती केली. एक एकर डाळिंब बाग मशागत, औषध, खाद्य, मजुरी असा लाख ते सव्वा लाख रुपये काढणीपर्यंत खर्च येतो. तो झालेला खर्चही वाया गेल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.

सोन्यासारखा हातातोंडाशी आलेल्या मालावर काळे ठिपके सड व गळ यामुळे बागांचे होत्याचे नव्हते झाले. दिवसरात्र राबून पिकविलेल्या या बागांमध्ये एकही फळ चांगले नजरेस पडत नसल्याने व खराब झालेल्या मालाला बाजारात कुणी घेत नसल्याने हतबल झालेल्या शेतकर्‍यांची व्यथा असून कृषी विभागाला कळविले. मात्र याचे पंचनामे करता येत नाहीत व हे कोणत्याच नैसर्गिक आपत्तीत बसत नसल्याचे कषी अधिकार्‍यांनी सांगून मदत मिळणार नसल्याने अखेर या बागांवर कुर्‍हाड चालविण्याची वेळ आल. त्यामुळे अनेकांनी बागा तोडायला सुरुवात केली आहे.

राहाता तालुक्यातील तेल्याचा सर्वाधिक फटका चोळकेवाडी परिसरातील अनिल चांगदेव नळे, नंदकिशोर नळे, रविकिरण नळे, रामदास तरकसे, शिवाजी नळे, सतिश नळे, राजेंद्र नळे, माधव नळे, मंजाबापू नळे, पोपट तरकसे, श्रीकांत चोळके, वसंत चोळके, नामदेव चोळके, अर्जुन दरेकर, संतराम मोरे, रामचंद्र अभोरे, अप्पासाहेब चोळके तसेच पिंपळवाडी व पिंपरी निर्मळ या गावांतील सर्वाधिक डाळिंब बागांना बसला आहे.

एकरी लाखो रुपये खर्च केला, भर उन्हाळ्यात दिवसरात्र राबलो. मात्र या तेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. चार पैसे मिळतील ही अपेक्षा होती. होता तेवढा खर्च केला, तोही वाया गेला. शेवटी बाग तोडून टाकत असून आता करायचे काय? सरकारने याप्रश्नी लक्ष घालून शेतकर्‍यांना मदतीचा हात द्यावा तरच शेतकरी उभा राहील, अशी मागणी डाळिंब उत्पादक तरुण शेतकरी रवींद्र नळे यांनी केली.

तयार झालेले फळ मात्र तेल्या रोगाच्या प्रादुर्भावाने खराब झाले. या मालास कोणीही ग्राहक विचारत नाही. मातीमोल भावाने विकावा लागतो किंवा फेकावा लागत आहे. सर्वच ठिकाणच्या बाजारपेठा व विक्री लॉकडाऊनमुळे बंद असल्याने सोलून दाणे विक्रीही बंदमुळे या मालाला खरेदीदारच नसल्याचे बाजार समितीतील आडते सांगत आहेत. असा माल आणूच नका, अशा सूचना उत्पादक शेतकर्‍यांना देत आहे.

तालुका कृषी अधिकारी शिंदे म्हणाले, तालुक्यातील काही भागात तेल्या रोगाची मोठ्या प्रमाणावर लागण झाल्याच्या तक्रारी येत असून आमच्या अधिकार्‍यांनी पाहणीही केली.तसेच नवीन बागांवर तेल्यापासून बचाव करण्यासाठी औषध फवारणी करण्याच्या सूचना दिल्या.

Deshdoot
www.deshdoot.com