
वीरगाव | Virgav
तेल्या आणि मररोगाने अनेक ठिकाणची डाळिंब शेती उद्ध्वस्त झाल्याने बाजारात मर्यादित आवक असल्याने डाळिंबाला समाधानकारक बाजारभाव आहेत. आता मात्र, कोकण तसेच इतरही ठिकाणाहून फळांचा राजा आंबा आणि उत्तर प्रदेश, बिहार, कलकत्त्याची लिची बाजारात आल्याने डाळिंबाच्या बाजारभावावर मर्यादा येईल.कदाचित काही दिवसांसाठी ते उतरतील देखील!
सध्या डाळिंबाला प्रतिकिलो 150 रुपयांपर्यंत बाजारभाव आहेत. मध्यंतरी अगदी 205 रुपये इतका तगडा बाजारभाव मिळाला. 80 ते 200 रुपये प्रतिकिलो याच दरम्यान यावर्षी बाजारभाव टिकून राहिल्याने सध्या डाळिंंब खाणे महागडे झाले आहे.
आता मात्र लिचीचे बाजारात आगमन झाले. फळांच्या राजाचीही आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असल्याने डाळिंबाचे बाजारभाव घसरणीला लागतील. जून ते ऑगस्ट असे तीन महिने आंबा बाजारात राहील. लिचीच्या फळांचीही आवक जून अखेरपर्यंत सुरू राहील. कारण 25 ते 30 दिवसच लिची फळांचा हंगाम असतो. त्यामुळे आगामी काळात डाळिंबाचा ग्राहक या दोन्ही फळांकडे वळणार असून बाजारभाव उतरण्याची शक्यता आहे.
डाळिंब हे औषधी असले तरी हंगामी फळ असणारी लिची त्वचा तजेलदार ठेवते, वजन कमी करते, अ आणि क जीवनसत्वे असणारी लिची जिभेला शीतलता देते. शरीर स्वस्थ ठेवणारे अनेक घटक लिचीत असल्याने ग्राहक या हंगामात लिची खरेदी करतातच.आंबा खरेदीचेही प्रमाण वाढत असल्याने डाळिंबाला ही दोन्ही फळे चांगला फटका देतील.
महाराष्ट्रात फळलागवड योजना मोठ्या असली तरी काही वर्षांपूर्वी तेल्या आणि मररोगाने डाळिंब शेती उद्ध्वस्त केली.डाळिंब बागाच गेल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला.अनेक वर्षे शेती डाळिंबाविना राहिल्याने हवेतून येणारा तेल्या आणि जमिनीतील बुरशीतून येणारा मररोग आटोक्यात आला असल्याने आता शेतकर्यांचा कल पुन्हा डाळिंबाकडे वाढू लागला आहे. अकोले-संगमनेर तालुक्यात आता नवीन लागवडी होत आहेत. सध्या औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात चांगली डाळिंब शेती आहे.
डाळिंबाला सध्या चांगला बाजारभाव मिळत असून येणार्या काही दिवसात आंबा आणि लिचीचा फटका डाळिंब बाजारभावाला नक्कीच बसेल.
सध्या आंबा 200 रुपये प्रतिकिलो दरम्यान विकला जातो. घाऊक बाजारपेठेत लिचीचा दरही 150 ते 200 रुपये इतका आहे. किरकोळ बाजारात लिची 220 ते 280 रुपये विकली जाते. या दोन्ही फळांची मोठी आवक येत्या काही दिवसांत वाढणार असून बाजारभाव खाली आल्यास ग्राहकांचा ओढा आंबा आणि लिचीकडे राहील. जून- ऑगस्टनंतर मात्र, बाजारातून या फळांचे प्रमाण कमी झाल्यास पुन्हा डाळिंब वधारेल. तोपर्यंत मात्र, ग्राहकांना डाळिंबाऐवजी आंबा आणि लिची हा चांगला पर्याय मिळणार आहे.