
अहमदनगर (प्रतिनिधी)
राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली की नाही, अशीच स्थिती सध्या आहे. आताचे सरकार फक्त राजकारणात गुंतले आहे व त्यांचे राज्य कारभारात लक्ष नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी येथे केली.
विरोधी पक्ष नेते दानवे यांनी शुक्रवारी सकाळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, संजय राऊत यांना धमक्या येत आहेत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणही सांगतात की त्यांचा पाठलाग होत आहे व जीवाला धोका आहे, प्रज्ञा सातव यांच्यावरही हल्ला झाला आहे.
एवढेच नव्हे तर नगर जिल्ह्यात पाथर्डीत गुरुवारी रात्री सराफी व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला झाला व त्याच रात्री केडगाव बायपासजवळ शिवाजी होले यांचा खून झाला आहे, लूट झाली आहे. इतके सगळे होत असताना महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही, कायद्याचा धाक राहिलेला नाही व राज्यातील सरकार फक्त राजकारणात गुंतले आहे, राज्यकारभाराकडे त्यांचे लक्ष राहिलेले नाही, असेच दिसत आहे, असेही दानवे यांनी आवर्जून स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करून मुंबईत तसे फ्लेक्स लागले असले तरी ते वावगे नाही. समर्थक कार्यकर्ते भावनेच्या भरात असे फ्लेक्स लावत असतात. त्यांचे नेत्यांवरचे प्रेम यातून दिसते. त्यांनाही वाटते की आपल्या नेत्याने मुख्यमंत्री वा पंतप्रधान व्हावे व ते स्वाभाविक आहे, असे स्पष्ट करून दानवे म्हणाले, पण यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता वा शिवसेना अडचणीत असे काही नाही. शिवसेना हा पक्ष नाही तर सेना आहे व आम्हाला संघर्ष नवा नाही. अशा संघर्षातूनच सेना आणखी ताकदीने वाढत आहे. आमचा सध्याचा संक्रमण काळ सुरू आहे. मात्र, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आधीच्या पेक्षा आणखी 10 जास्त जागा निवडून आणण्याचा संकल्प आम्ही केला आहे, असे ते म्हणाले.
दानवे यांनी कदम यांच्या निवासस्थानी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या राजकीय घडामोडींचा सर्वसामान्य शिवसैनिकांवर कोणताही परिणाम झालेला नाही. आजही शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्यामागे खंबीरपणे उभे आहेत. स्वार्थासाठी काही लोक शिवसेना सोडून गेले असले तरी त्याचा कोणताही परिणाम पक्षावर होणारनाही. नगरमध्ये शिवसेनेचे चांगले पद्धतीने काम सुरू असून, शिवसैनिकांना ताकद देण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून केले जाईल, असे त्यांनी आवर्जून सांगितले.