कर्डिले अन् ॲड. पाटलांशी झालाय पुन्हा गोडवा; मुहूर्त शोधला दिवाळीचा पाडवा

नामदेवराव ढोकणे यांचे पुन्हा नेत्यांबरोबर मनोमिलन; विखेंची डोकेदुखी थांबली
कर्डिले अन् ॲड. पाटलांशी झालाय पुन्हा गोडवा; मुहूर्त शोधला दिवाळीचा पाडवा

उंबरे (वार्ताहर)

चार वर्षांचा दुरावा दूर सारण्यासाठी मुहूर्त मिळाला पाडव्याचा, अन् मनोमिलनातून आनंद मिळाला गोडव्याचा, आपल्या ज्येष्ठांचा सत्कार करताना त्यांचे आशिर्वाद घेऊन फिटे कटूतेचे जाळे, झाले मोकळे आकाश, अशी काहीशी आनंदावस्था डॉ. तनपुरे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांची झाली.

दरम्यान, दिवाळसणाच्या पार्श्वभूमीवर या मनोमिलनामुळे विखे व अॅड.पाटील समर्थकांमध्ये आनंदाचे फटाके फुटले. मात्र, विरोधी गटाचा बार अगदीच फुसका ठरला. ढोकणे व पाटील यांच्यातील दुराव्यामुळे विखे पितापुत्रांमध्येही 'टेन्शन' होते. मात्र, आता या गोडव्यामुळे त्यांच्या मनातही खुशीचा फुलबाजा फुलला.

त्यांचे असे झाले, चार वर्षांपूर्वी डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर स्व. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे मानसपुत्र व ज्येष्ठनेते अॅड. सुभाष पाटील यांचे सुपूत्र उदयसिंह पाटील यांची वर्णी लागली. लोणीहन आलेल्या लखोट्यात उदयसिंह पाटील यांचे नाव निघाले. त्यामुळे त्यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. मात्र, निवडीनंतर या पदासाठी इच्छुक असलेल्या नामदेवराव ढोकणे यांची नाराजी वाढली. पर्यायाने त्यांनी पाटील पितापुत्रांबरोबर आपले घरोब्याचे अन् मित्रत्वाचे संबंध 'लॉक' करून ठेवले. त्यामुळे या घडून बिघडलेल्या संबंधांची चर्चा तालुक्याच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात बहुचर्चित ठरली. दरम्यान, कारखाना निवडणुकीच्या शेवटच्या वर्षात उदयसिंह पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर ढोकणे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. मात्र, तरीही ढोकणे यांनी ज्येष्ठनेते अॅड. पाटील गटाकडे पाठ फिरविली होती. अधूनमधून त्यांच्यात टीकाटिप्पणीचा सूर उमटत होता. त्याचा परिणाम सत्ताधारी संचालक मंडळ आणि विखे गटावर झाला होता. तर या दुराव्यामुळे विरोधी गटाला आनंदाची उकळी फुटत होती.

अध्यक्षपदी विराजमान होऊन एव्हाना ढोकणे यांना दीड वर्ष उलटून गेले. सरतेशेवटी ढोकणे यांच्या मनात अॅड. पाटील यांच्याविषयी बिघडलेल्या संबंधाची हूरहूर कायमच होती. दरम्यान, दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधून ढोकणे यांनी अॅड. पाटील यांची गळाभेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. मनमोकळ्या गप्पांची मैफील बसवून भरून आलेले मनाचे आभाळ मोकळे करून टाकले. अन् विखे गटाचा जीव भांड्यात पडला.

या गोड अन् बहुचर्चित घटनेच्या वेळी डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शामराव निमसे, राहुरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे, कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, उत्तमराव म्हसे यांच्यासह सर्व आजी-माजी संचालकांची हजेरी लावली.

ढोकणे थेट बुऱ्हाणनगरला

विधानसभा निवडणुकीपासून नामदेवराव ढोकणे यांचा माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याबरोबरही दुरावा निर्माण झाला होता. मात्र, ढोकणे यांनी बुऱ्हाणनगरला कर्डिले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याबरोबरही पुन्हा आपल्या मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करून नवीन सहकार व राजकीय पर्वाला दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सुरूवात केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com