शिर्डी/संगमनेर (प्रतिनिधी)- राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील शह-काटशाहचा खेळ आता गल्लीबोळात उतरला आहे.

एकमेकांचे समर्थक कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरू झाल्याचे चित्र समोर आले आहे. थोरात गटाने भाजपच्या युवा उपाध्यक्षाला काँग्रेसमध्ये प्रवेश दिला तर विखे गटाने जोर्वेच्या सरपंचाला भाजपात आणले. एकामेकांना धक्का देण्याच्या या खेळातील आरोपांची जंत्रीही तशीच गमतीशीर आहे. हुकूमशाही शक्ती तालुका आणि जिल्हा ताब्यात घेवू पाहात असल्याचा आरोप थोरात गटाकडून झाला तर काँग्रेसकडून विकासकामांना अडथळा असल्याची टीका विखे गटाकडून झाली. जिल्ह्यातील या दोन मातब्बर नेत्यांच्या गटाकडून झालेला हा राजकीय गल्ली’विकेट’चा खेळ सध्या चर्चत आहे.

भाजप युवाचे उपाध्यक्ष लोंढे काँग्रेसमध्ये

शिर्डी विधानसभा मतदार संघातील अस्तगावचे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा अस्तगाव ग्रामपंचायतीचे युवा ग्रामस्थ विकास पॅनलचे नेते अॅड.पंकज लोंढे यांनी नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

संगमनेर येथे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी अॅड. पंकज लोंढे व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी काँग्रेस नेते सुरेशराव थोरात उपस्थित होते. याप्रसंगी माजी उपसरपंच किरण गायकवाड, माजी उपसरपंच दादासाहेब गवांदे, महेश त्रिभुवन, सतीश आग्रे, प्रवीण घोडेकर, दिलीप नळे, समद शेख, गणेश चोळके यांसह अस्तगावच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अॅड. पंकज लोंढे म्हणाले की, भाजपा हा हुकूमशाही पद्धतीने राज्य करू पाहत आहे. पक्षाची मूळ विचारधारा बाजूला होऊन काही शक्ती तालुका-जिल्हा ताब्यात घेऊ पाहत आहे. या अत्यंत लोकशाहीला घातक आहे. देशातील भाजपाची नीती ही चुकत आहे. याउलट काँग्रेस मात्र कायम जनसामान्यांसाठी काम करत राहिला आहे.

जोर्वे सरपंच खैरे भाजपमध्ये

जोर्वे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच रविंद्र खैरे यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून गावाच्या विकास कामात नेहमीच होत असलेल्या अडवणुकीला कंटाळून आपण भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे खैरे यांनी सांगितले.

सरपंच खैरे हे लोकांमधून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडून आले, परंतू उर्वरित सदस्य हे आ. विखे पाटील गटाचे निवडून आले होते. सरपंच विरोधी पक्षाचा होता तरी आ. विखे पाटील यांनी विकासकामांना सहकार्य सुरूच ठेवले होते. परंतू सरपंच खैरे यांना पुढे करून या सुरू असलेल्या विकास प्रक्रीयेत अडथळा निर्माण करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाकडून वारंवार दबाव आणला जात होता. गावाच्या हिताकरीता सुरू असलेली कामे माझ्या एकट्याच्या विरोधाने बंद पडू नयेत ही माझी भूमिका होती असे खैरे यांनी सांगितले.

जोर्वे गावातील विकास प्रक्रीया आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक गतीने पुढे जावी आणि आपल्याला यामध्ये योगदान देता यावे म्हणून भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे खैरे यांनी सांगितले.

सरपंच खैरे यांच्या प्रवेशाप्रसंगी उपसरपंच गोकुळ दिघे, माजी सरपंच दिलीप इंगळे नानासाहेब थोरात, बाळासाहेब दिघे, जितेंद्र दिघे, शंकर माळी, पप्पूभाई बलसाने आदी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.