लोकप्रतिनिधींसह तालुक्यातील नेत्यांनी करोना काळात आढळा विभागाकडे फिरवली पाठ

लोकप्रतिनिधींसह तालुक्यातील नेत्यांनी करोना काळात आढळा विभागाकडे फिरवली पाठ

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील आढळा विभागात करोनाचे संकट मोठ्या प्रमाणात फोफावत चालले आहे. सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकांचे करोनाने मृत्यू झाले आहेत. तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी यांचेसह नेत्यांनी या विभागाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

आढळा परिसरात करोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. या परिसरातील नागरिक हतबल झाले असताना माजी आ. वैभवराव पिचड व अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांनी समशेरपूर येथे कोविड सेंटर सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या व्यतिरिक्त तालुक्यातील विविध संस्थांवर पदे भूषविणारे, जिल्ह्याच्या राजकारणात वरचष्मा असणार्‍या नेत्यांनी आढळा परिसराकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे.

आढळा परिसरात बिताक्यापासून ते गणोरेपर्यंत सर्वच गावांमध्ये करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. ज्या त्या गावातील जागृत नागरिक रुग्णांची काळजी घेण्याचे काम करत आहे.

अकोले तालुक्यात दोन तीन ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आले. तेथील प्रकार जनतेने अनुभवले असे असतानाही लाखो रुपयांची मदत तालुक्यातील नेत्यांनी त्या ठिकाणी केली.अनेकांनी पोपट पंची करत श्रेय घेण्याचा प्रयत्नही सुरु केला आहे,मात्र आढळा विभागाचा या नेत्यांना पूर्णपणे विसर पडला आहे.

राजकारणासाठी आढळातील जनतेचा आणि नेत्यांचा फक्त वापर करायचा, निवडणुकांपूरते आभाळभर आश्वासने द्यायची एकदा की आपले काम झाले की दुर्लक्ष करायचे ही भूमिका नेहमीच तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी आढळा विभागाबाबत घेतली आहे.

तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या पतसंस्था समशेरपूर या ठिकाणी आहेत. त्या प्रमुख पतसंस्थांमध्ये या विभागातील शेतकर्‍यांच्या ठेवी आहेत, कर्जही घेतलेले आहे. त्यातून मिळणार आर्थिक नफा या पतसंस्थाना मिळत आहे. मग या विभागातील जनतेच्या जिवावावर धनदाडगे झालेल्या या नेत्यांना अडचणीत असलेल्या जनतेचा विसर पडणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे.राजकारणात या विभागातील जनतेच्या जीवावर मोठे झालेल्या नेत्यांनी सोयीस्कर पणे जनतेला वार्‍यावर सोडून दिलेले दिसत आहे. एक रुपयांची मदत आढळा विभागातील करोना रुग्णांसाठी या नेत्यांकडून झाली नाही. आरोग्य केंद्रामध्ये कोणत्याही सुविधा नाहीत, करोनाच्या टेस्ट होत नाही, लसीकरणासाठी नागरिकांना तासंतास ताटकळत बसावे लागत आहे. या भागातील खाजगी डॉक्टर जनतेची मोठ्या प्रमाणात जनतेची आर्थिक लूट करत आहे, प्रशासनाकडून करोना सेंटर साठी कोणतीही मदत होत नाही. करोना सेंटर सुरू झाल्यापासून एकदाही सरकारी यंत्रणा या ठिकाणी पोहचली नाही.

आढळा परिसरातील जनता अडचणीत असताना तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना व प्रशासनाला याचे गांभीर्य वाटत नाही, या गोष्टीचा आढळा विभागातून नाराजी व्यक्त केली जात आहे. करोनाच्या कालावधीत शासनाच्या वतीने जनतेसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा आढळा विभागाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा अरुण शेळके, कैलास जाधव, राहुल बेनके, सोमनाथ मेंगाळ, बादशहा एखंडे, चक्रधर सदगीर, विलास भरीतकर, भरत मेंगाळ, के. बी. दराडे, नामदेव मधे, पुनाजी मेंगाळ, मधुकर दराडे आदी आढळा विभागातील कार्यकर्ते व नागरिकांनी दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com