अ‍ॅपच्या माध्यमातून गुन्हेगारांपर्यंत पोहचणार पोलीस

पोलिसांकडून सीएमआयएस अ‍ॅप विकसीत
अ‍ॅपच्या माध्यमातून गुन्हेगारांपर्यंत पोहचणार पोलीस

अहमदनगर (प्रतिनिधी) - पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस दलाने अ‍ॅप विकसित केले आहे. सीएमआयएस नावाच्या या अ‍ॅपमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या घराचा पत्ता, त्याच्यावरील दाखल असलेले गुन्हे याची माहिती भरली जाणार आहे.

अधीक्षक पाटील यांनी प्रायोगिक तत्त्वावर संबंधित गुन्हेगारांचे घर तपासणीसाठी व संबंधित गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी प्रात्यक्षिक घेतले. अधीक्षक पाटील यांनी स्वत: भिंगार परिसरामध्ये असलेल्या गुन्हेगारांचा पत्ता अ‍ॅपच्या माध्यमातून शोधता येईल का, याची पडताळणी केली. जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारी लक्षात घेता गुन्हेगारांवर जरब बसण्यासाठी पोलीस अधीक्षक पाटील यांनी धडक कारवाई हाती घेतली आहे. गेल्या सहा महिन्यांत चार टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.

ज्या आरोपींनी दोन पेक्षा अधिक गुन्हे केले आहेत त्यांचे नाव टू प्लस यादीमध्ये जोडले जात आहे. जिल्ह्यामध्ये टू प्लसमध्ये अनेक आरोपींचा समावेश झालेला आहे. त्या आरोपींचे घर नेमके कुठे आहे, आरोपी जर घरीच असतील तर त्यांच्यावर वॉच ठेवला गेला पाहिजे, त्यांच्या घराची सुद्धा तपासणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे, त्या करता संबंधित अ‍ॅपच्या माध्यमातून आता या आरोपींच्या घराचा तपास अत्यंत सहज गतीने होऊ शकणार आहे. या अगोदर सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे अ‍ॅप अधीक्षक पाटील यांनी तयार केले होते. त्यामध्ये काही प्रमाणामध्ये बदल करून ते आता नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत केले जाणार आहे. सदरचे अ‍ॅप प्रायोगिक तत्वावर तयार झाले आहे, त्यात काही बदल केले जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com