
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी शहर पोलीस ठाण्याला देण्यात आलेल्या वाहनाचा अन्य कामासाठी वापर होत असल्याचे दिसत आहे.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांची त्वरित मदत मिळावी या हेतूने 112 नंबर संपूर्ण देशभरात सुरू करण्यात आला आहे. एखादा नागरिक एखाद्या संकटात सापडला तर तो या नंबरवर फोन करू शकतो. या फोनमुळे माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी त्वरित पोहचतात. संबंधित नागरिकाला संकटातून वाचवण्याचे काम होण्यास त्यामुळे मदत होते.
यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक स्वतंत्र वाहन देण्यात आलेले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यालाही असे वाहन देण्यात आलेले आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या वाहनाचा उपयोग मूळ कारणासाठी करण्याऐवजी दुसर्याच कामासाठी केला जातो.
शहर पोलीस ठाण्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या कारकिर्दीत या वाहनाचा अन्य कामासाठी वापर सुरू करण्यात आला. या वाहनावर 112 नंबरही दिसत नाही. यामुळे एखादी आपत्कालीन घटना घडल्यास पोलीस घटनास्थळी कसे पोहोचणार? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दुसर्या गाडीची आणखी दुर्दशा आहे. रस्त्यात कोठेही ही गाडी बंद पडते. मोठी दुर्घटना घडल्यास या गाडीचा उपयोग होऊ शकत नाही.