घटस्फोटीत महिलेवर पोलीस शिपायाचा अत्याचार

घारगावचा पोलीस शिपाई व गर्भपात करणार्‍या डॉक्टरसह चौघांविरोधात गुन्हा दाखल
घटस्फोटीत महिलेवर पोलीस शिपायाचा अत्याचार

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

जीवनसाथी डॉट कॉम संकेतस्थळावर घटस्फोटीत महिलेशी संपर्क करून तिला घरी बोलावून अत्याचार करून तिला गर्भपात करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी

घारगाव पोलीस ठाण्याचा पोलीस शिपाई, डॉक्टर आणि अकोल्यातील एका महिलेसह दोघांवर अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी, बेकायदेशीर गर्भपात व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अत्याचारीत महिलेने घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी सोलापूर जिल्ह्यातील असून घटस्फोटीत आहे. लग्न करण्यासाठी जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर नावनोंदणी केली. त्यानुसार घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सुनील यशवंत रत्नपारखी याने मला माझ्या मोबाईलवरून लग्नाची मागणी घातली. मला एक 10 वर्षांची मुलगी आहे. तिचा सांभाळ करणार असाल तर मी लग्नास तयार आहे असे मी सांगितले. त्यानेही मी घटस्फोटीत असून मला दोन मुली आहेत, असे सांगितले.

त्या दोघांचीही लग्नावरून परस्पर सहमती झाल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्या कर्मचार्‍याने थेट त्या महिलेचे सोलापूर जिल्ह्यातील गाव गाठले. त्यावेळी त्याने सदर महिलेच्या आई व भावाशी चर्चा करून लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्या दिवसापासून तो मोबाईलद्वारे दररोज त्या महिलेच्या संंपर्कात राहिला.

या दरम्यान फेब्रुवारीमध्ये एक दिवस त्याने आपले आपल्या घटस्फोटीत बायकोशी भांडण झाले असून माझ्या दोन्ही मुलाला ती घेऊन गेली असल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी मी एक मुलगी सोबत आणली असून तशी नोटरी केली असल्याचे त्याने त्या महिलेला कळविले. माझ्या मुलीची परीक्षा असल्याने त्याने तिला घारगावला येण्याची गळ घातली. त्यानुसार 17 फेब्रुवारी रोजी सदर महिला सोलापूरवरून शिर्डीत आली.

संबंधित कर्मचार्‍याने तिला शिर्डीतून थेट घारगावला आणले. त्या दिवशी त्या कर्मचार्‍याला रात्रपाळी असल्याने त्याने त्या महिलेला तिच्या व स्वत:च्या मुलीसह आपल्या खोलीवर ठेवले व तो निघून गेला. मात्र मध्यरात्री तो परत घरी आला. तेव्हा दोन्ही मुली झोपलेल्या होत्या. त्या संधीचा फायदा घेऊन त्याने त्या महिलेच्या इच्छेविरुध्द तिच्यावर अत्याचार केला. मात्र घारगाव तिच्यासाठी नविन असल्याने व अत्याचार करणारा पोलीस कर्मचारी असल्याने ती रात्रभर तशीच राहिली.

दुसर्‍या दिवशी त्या महिलेच्या आईने फोन केला असता त्याने आपल्या मुलीच्या परीक्षेचे कारण पुढे करून काही दिवस तिला घारगावला राहू द्यावे. आम्ही लग्न करणारच असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या महिलेने लग्न कधी करणार याबाबत विचारणा केली असता 19 फेब्रुवारी रोजी त्याने मंगळसूत्र व जोडवे आणून तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. नंतर चार दिवसांनी सदर महिला दोन्ही मुलींना घेऊन सोलापूर जिल्ह्यातील आपल्या गावी गेली.

काही दिवस थांबून रत्नपारखी याच्या मुलीची परीक्षा असल्याने तिला घेऊन पुन्हा घारगावला आली. त्या दरम्यान त्याने वेळोवेळी लग्नाचे अमिष दाखवत अत्याचाराचा शिलशिला सुरुच ठेवला. त्यातून तिला गर्भधारणा झाली. ही गोष्ट समजताच त्याने गर्भपात करण्याचा आग्रह सुरू केला. मात्र सदर महिला त्याच्या विरोधात ठाम असल्याने अखेर त्या कर्मचार्‍याचे नातेवाईक असलेले अकोले तालुक्यातील अमोल कर्जुले व त्याची आई यांनी घारगावात येऊन गर्भपातासाठी दबाव आणला.

यातून त्या महिलेच्या 10 वर्षीय मुलीलाही मारहाण, दमदाटी, शिवीगाळ करण्यात आली. अखेर जबरदस्तीने तिला आळेफाटा येथील निरामय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व बळजबरीने तिचा बेकायदा गर्भपात केला गेला. त्यामुळे आपण फसल्याची जाणीव तिला झाली आणि तिने अखेर घारगाव पोलीस ठाणे गाठून आपली हकीगत सांगितली.

संगमनेर उपविभागीय अधिकारी राहूल मदने यांनी स्वत: घारगाव पोलीस ठाण्यात उपस्थित राहून त्या महिलेची हकीगत ऐकली. त्यानुसार संशयित आरोपी पोलीस शिपाई सुनील यशवंत रत्नपारखी, आळेफाटा येथील निरामय रुग्णालयाचे डॉ. व्ही. जी. महेर, पोलीस शिपायाचे नातेवाईक, अमोल कर्जुले व त्यांची आई अशा चौघांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे सुधारीत सन 2015 चे कलम 3(1) (थ) (ळ) (ळळ), 3(2)(5), 3(2) (5-र), भादवी कलम 376, 376(2) (एन), 313, 354, 354 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे व बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 10 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com