पोलिसांना आढळलेले कासव वन विभागामार्फत पुन्हा निसर्गाच्या स्वाधीन

भोकर येथील घटना
पोलिसांना आढळलेले कासव वन विभागामार्फत पुन्हा निसर्गाच्या स्वाधीन

भोकर (वार्ताहर) | Bhokar - श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे तपासादरम्यान येथील एका कुटूंबाकडे आढळलेले कासव श्रीरामपूर तालुका पोलिसांनी वनविभागाच्या स्वाधीन केल्याने पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे एक वन्यजीव पुन्हा निसर्गाच्या स्वाधीन झाल्याचे समाधान अनेकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

रविवार दि. 5 जुलैच्या रात्री श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलिसांना भोकर शिवारातील एका ठिकाणी हातभट्टीचे रसायन असल्याची खबर गुप्त खबर्‍यामार्फत मिळाल्यानुसार पो. ना. आबसाहेब गोरे, पो. कॉ. योगेश राऊत व पो. कॉ. श्रीकांत वाबळे आदींनी तेथे जावून झडती घेतली असताना त्यांना त्या ड्रममध्ये कासव असल्याचे दिसले. त्यांनी लागलीच पोलीस पाटील बाबासाहेब साळवे, वनक्षेत्रपाल संतोष जाधव यांच्याशी संपर्क साधला. कासव हा वन्यजीव असल्याने त्याला कुणालाही पाळता येत नाही ती वन्य मालमत्ता असल्याने आमच्या स्वाधीन करा आम्ही त्यास पुन्हा निसर्गाच्या स्वाधीन करणार असल्याचे सांगितले.

त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी वनक्षेत्रपाल संतोष जाधव व वनपाल भाऊसाहेब गाडे यांचेशी संपर्क करून रात्री उशीरा वरीष्ठांच्या सल्ल्यानुसार तालुका पोलीस ठाण्यातून वनविभागाचे सुर्यकांत लांडे यांच्या स्वाधीन करून आपले कर्तव्य पार पाडले. याबाबत वनक्षेत्रपाल संतोष जाधव यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की, कासव हा वन्यजीव आहे, तो पाळता येत नाही, ती निसर्गाची देणगी आहे त्यामुळे त्यास निसर्गातच सोडावे लागते त्यानुसार आम्ही त्यास पुन्हा निसर्गाच्या स्वाधीन करणार असल्याचे सांगीतले.

तालुका पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचार्‍यांच्या कामगीरीमुळे हा वन्यजीव पुन्हा निसर्गाच्या स्वाधीन झाल्याने अनेक वन्यजीव प्रेमींकडून समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com