
सोनई |वार्ताहर| Sonai
सोनई पोलीस कर्मचारी घोडेगाव येथे रात्रीची गस्त घालत असताना तिन इसम संशयितरित्या दुचाकीवरून फिरत असताना गाडी ताब्यात घेतल्याचा राग आल्याने पोलीस ठाण्यात येऊन कर्मचार्यांना दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणल्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गोरक्षनाथ आघाव (वय 36, धंदा नोकरी) यांच्या फिर्यादीवरून प्रसाद उर्फ भैय्या संजय हापसे (रा. ब्राह्मणी तालुका राहुरी), लक्ष्मण चंद्रभान मरकड (रा. राहुरी) व युनूस निसार शेख (रा. शिवनेरी कॉलनी ता. राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनई पोलीस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी की, घोडेगाव येथे सोनई पोलीस ठाण्याचे कर्मचारी रात्रीची गस्त घालत असताना त्यांना एक जून रोजी 4 वा. एका काळ्या रंगाच्या बजाज पल्सर (एमएच 17 सीएन 3268) मोटरसायकल संशयीत वाटल्याने मोटरसायकल पोलीस स्टेशनला आणली. या मोटरसायकलची खात्री करून पोलीस ठाणे दैनंदिनीला नोंद केल्यानंतर यातील आरोपी मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कारमध्ये (नं. एमएच 01 सीआर 0864) पोलीस ठाण्यात आले व फिर्यादी हे त्यांचे सरकारी काम करत असताना त्यांना व इतर साक्षीदार यांना, तुम्ही कशी आमची गाडी सोडत नाही, तुम्हाला पाहून घेतो, असा दम देऊन आरोपी त्याचे खाजगी मोबाईलमध्ये शूटिंग काढत असताना फिर्यादीने त्यांना समजावले.
तेव्हा त्याने फिर्यादीची गचांडी धरून फिर्यादीस भिंतीवर लोटून दिले व साक्षीदार पोलीस नाईक बाळासाहेब बाचकर, पोलीस कॉन्स्टेबल रामदास तमनर यांना देखील आरोपी हापसे याने गचांडी धरून खाली पाडले तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल जवरे यांना आरोपींनी शिवीगाळ दमदाटी केली व स्विफ्ट कारमध्ये बसून निघून गेले. या फिर्यादीवरुन तिघाविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात भादंवि कलम 353, 332, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी पुढील तपास करीत आहेत.