पोलिसांनी पकडली ३० लाख रुपये किंमतीची साठ किलो बेहिशोबी चांदी

पोलिसांनी पकडली ३० लाख रुपये किंमतीची साठ किलो बेहिशोबी चांदी

कोपरगाव | प्रतिनिधी | Kopergoan

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहे. यामध्ये साई तपोभूमी चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली होती.

शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी ६० किलोची बेहिशोबी चांदी घेऊन जात असताना कोपरगाव शहर पोलिसांनी ती हस्तगत केली आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केलेल्या आदेशानुसार कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कलम १४४ नुसार कडक अंमलबजावणी सुरु आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. याच दरम्यान शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील राजगुरूनगर हुपरी येथील सौरभ अनिल पाटील हा व्यापारी सियाज कारमधून (क्र.एमएच.१८, एजे.९०२०) येवला-कोपरगाव मार्गे शिर्डीकडे जात होता. पो. काँ. विशाल कोळपे यांनी गाडीची काच उघडी ठेवून आणि तोंडाला मास्क लावलेला नसल्याने दंडात्मक कारवाईसाठी गाडी थांबविली.

मात्र, त्याने मी हार्डवेअर दुकानदार असून गाडीमध्ये काहीही नसल्याचे सांगितले. त्यावेळी साई कॉर्नर येथे नाकाबंदीसाठी तैनात असलेले पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहाय्यक फौजदार साठे, पोलीस शिपाई राम खारतोडे, नवाळी, गृहरक्षक दलाचे जवान अमोल थोरात हे पथक होते. आरोपीने गाडीत काही नसल्याचे सांगितल्याने, पोलीस निरीक्षक देसले यांचा संशय बळावल्याने त्यांनी गाडीची झडती घेण्यास सहकाऱ्यांना सांगितले. झडती घेतली असता गाडीच्या पाठीमागील सिटला चैन दिसली. व तो भाग फुगीर दिसला अधिक तपासणी केली असता आत मध्ये एक चोर कप्पा बनविलेला होता. त्यात एका पांढ-या रंगाच्या गोणीमध्ये चांदीसदृश्य ठोकळे दिसले. याची खातरजमा करण्यासाठी विचारल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर कोणतेही खरेदीचे कागदपत्रे मिळून न आल्याने पोलिसांनी गुरनं.१२०/२०२१ मपोका.१२४, भादंवि.१८८ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ५ लाख रुपयांची कार आणि ३० लाख रुपये किंमतीची चांदी असा ३५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्यासह पथकाने केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com