
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पोलीस भरतीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. याबाबत नगरमधील तरूणांनी खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे पूर्वीप्रमाणे भरती प्रक्रिया पार पाडण्याची मागणी केली. त्यावर कोल्हापूर येथे होणार्या कार्यक्रमात नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांसमवेत पूर्वीप्रमाणे पोलीस भरती पार पडण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे शिफारस करू, असे आश्वास खा. सुळे यांनी दिले. तसेच दिल्लीसह अन्य ठिकाणी होणार्या दंगली या देशासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी घातक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यानंतर खा. सुळे बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते. खा. सुळे म्हणाल्या, महाराष्ट्र नेहमीच सामाजिक प्रश्नांवर देशात अग्रसर राहिलेला आहे. देशात सामाजिक परिवर्तनाची सुरूवात महाराष्ट्रातून झालेली आहे. सध्या राज्यात गाजत असलेला भोंग्याचा विषय हा केवळ माध्यमामध्ये चर्चेत आहे. सर्वसामान्यांच्या घरात आज महागाई, वाढलेले तेलाचे भाव, गॅस दरवाढ यावर चर्चा होतांना दिसत आहे. भोंग्याच्या बातम्या थांबल्या की हा विषयही आपोआप थांबेल, अर्थात लोकशाहीत कोणी काय बोलावे याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि प्रसारमाध्यमांनी काय बातम्या द्याव्यात, हा त्यांचा हक्क आहे. पण माझी विनंती आहे की प्रसार माध्यमांनी प्रश्नांचे प्राधान्यक्रम ठरविले पाहिजेत.
दोन-अडीच वर्षानंतर आता कुठे कोविडमधून बाहेर पडतांना देशात घडणार्या दंगली या चुकीच्या असून कदाचित निवडणूका डोळ्या समोर ठेवून हे सर्व सुरू असल्याची शक्यता आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच दिल्लीतील दंगलीची जबाबदारी हे केंद्र सरकारची आहे. दिल्ली पोलीसांवर केंद्रीय गृहमंत्र्यांचे नियंत्रण असल्याचे खा. सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले. वाढत्या महागाईवर मी सातत्याने संसदेत आवाज उठवलेला असून उत्तर प्रदेश निवडणूका होईपर्यंत पेट्रोलचे भाव वाढून दिले नाही. त्यानंतर सातत्याने पेट्रोलचे दर वाढत असल्याचे खा. सुळे म्हणाल्या.
महाविकास आघाडीच्या विरोधात आणि भाजपच्या बाजूने बोलणार्यांना केंद्राकडून संरक्षण देण्यात येत आहे. तसेच ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या मातीच्या संरक्षण यंत्रणेवर आपला विश्वास नसेल तर यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. देशात महाराष्ट्र पोलीस ही सर्वात चांगली यंत्रणा असल्याचे खा. सुळे यांनी सांगितले. पालकमंत्री बदलाचा निर्णयावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलू शकतात, असे म्हणत हा विषय त्यांनी टाळला. मी भोंग्याच्या विषयात नव्हे तर महागाईच्या विषया अडकली असून आरोप करणे हे विरोधकांचे काम आहे. उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्यावर खा. सुळे म्हणाल्या की, उध्दव ठाकरे, रश्मी ठाकरे या नियमित अयोध्याला जात असतात. कोणी कोठे जावे यावर बंधन नाही. लोकशाहीत विरोधी पक्ष हा सक्ष्म असणे आवश्यक आहे. कोणीही सत्ते असो विरोधक सक्ष्म हवा असे मतही त्यांनी नोंदवले.
केंद्रीय विद्यालयात खासदारांचा प्रवेश कोटा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय चुकीचा आहे. पूर्वी हा कोटा दहा विद्यार्थ्यांचा होता आता तर तो वाढवून 50 करायला हवा. ज्या सामान्यांना वाटते की आपल्या मुलांचे शिक्षण केंद्रीय विद्यालयात व्हावे, त्यांच्यासाठी हा निर्णय चुकीचा असल्याचे खा. सुळे यांनी सांगितले. पूर्वी प्रमाणे प्रवेशाचा कोटा सुरू राहावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. सुळे यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील पर्यटन आराखड्याची माहिती देताना खा. सुळे म्हणाल्या, पुणे जिल्ह्यात एका ठिकाणी पुणेकर मोठ्या संख्येने कोल्हे यांना पहावयास गर्दी करतात. त्यावर व्यासपिठावर बसलेल्यांपैकी कोणीतरी कोपरगावात काळे आणि कोल्हे आहेत, असे म्हटले. त्यावर खा. सुळे यांनी कडी करत कोपरगावला काळे आणि कोल्हे यांना पाहायला लोक येत असतील हे मला माहीत नाही. त्यावर एकच हशा पिकला.
जिल्ह्यातील आमदारांचे कौतुक
नगरच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचे खा. सुळे यांनी कौतुक केले. हे सर्व आमदार तरुण असून काम करून घेण्यात ते पटाईत आहेत. आ. नीलेश लंके हे पोहचलेला आमदार आहे. तर देशभरातील खासदार आणि त्यांचे नातेवाईकांना साई दर्शन घेऊन देण्याचे काम आ. आशुतोष काळे हे करत आहेत. साई दर्शन घेणार्या या सर्वाचे आशिर्वाद आ. काळे यांच्या रुपाने राष्ट्रवादीला मिळत आहेत. यासह आ. जगताप आणि आ. लहामटे यांचे ही कौतुक खा. सुळे यांनी केले.