पोलीस भरती : मैदान सज्ज !

2 ते 14 जानेवारीदरम्यान प्रक्रिया || दररोज एक हजार उमेदवारांची चाचणी
पोलीस भरती : मैदान सज्ज !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पोलीस भरतीच्या नगर जिल्ह्यातील 139 जागेसाठी 12 हजार 334 अर्ज दाखल झाले आहेत. आता प्रत्येक्षात मैदानी चाचणीला 2 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. 2 जानेवारी ते 14 जानेवारीदरम्यान येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर चाचणी घेण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून तयारी पूर्ण झाली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली 386 पोलीस अधिकारी-अंमलदारांचा बंदोबस्त भरती प्रक्रियेसाठी असणार आहे.

जिल्ह्यात 129 पोलीस शिपाईच्या जागेसाठी 11 हजार 188 तर चालकाच्या 10 जागेसाठी एक हजार 146 अर्ज दाखल झाले आहेत. एका जागेसाठी 88 उमेदवार स्पर्धेत आहे. गेल्या सहा ते सात वर्षानंतरची एवढ्या मोठ्या प्रमाणातील ही पहिलीच भरती असल्याने मुलांनी जोरदार तयारी केली आहे. अनेक ठिकाणी मुलांच्या सरावांनी मैदाने गजबजली आहेत. जिल्हा पोलिसांकडूनही मैदानी चाचणीसाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अत्यंत पारदर्शक पध्दतीने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, तसे नियोजन करण्यात आले आहे.

येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार्‍या चाचणीसाठी पहाटे पाच वाजता उमेदवारांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एका दिवशी एक हजार उमेदवारांना चाचणीसाठी बोलविण्यात आले आहे. सुरूवातील 2 व 3 जानेवारीला पोलीस चालक पदाच्या 10 जागेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे. यानंतर 4 ते 14 जानेवारीदरम्यान पोलीस शिपाई पदाच्या 129 जागेसाठी मैदानी चाचणी पार पडणार आहे.

पहाटे पाच ते सकाळी 11 वाजेपर्यंत दररोजचे नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण मैदानी चाचणीवर सीसीटिव्हीचा वॉच असणार आहे. मैदानी चाचणी ठिकाणी कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी लाचलुचपत विभागाचे एक पथकही असणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार पहाटे पाच वाजता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

असा आहे बंदोबस्त

संपूर्ण भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक 5, पोलीस निरीक्षक 20, सहाय्यक पोलीस निरीक्षक 11, पोलीस उपनिरीक्षक 26, पोलीस अंमलदार 236, महिला पोलीस अंमलदार 88 असा बंदोबस्त असणार आहे.

मैदानाबाबत...

येथील पोलीस मुख्यालयच्या मैदानावर तयारी करण्यात आली आहे. कागदपत्रांची तपासणी, छाती, उंचीची मोजणी, गोळा फेक व 100 मीटर धावणे हे येथील मैदानात होणार आहे. तर मुलींसाठी 800 मीटर व मुलांसाठी 1600 मीटर धावण्यासाठी अरणगाव शिवारात व्यवस्था करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com