
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पोलीस शिपाई पदासाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीला 676 उमेदवारांनी हजेरी लावली तर 324 जण गैरहजर राहिले. 51 जणांना अपात्र ठरविले. 625 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली.
नगर जिल्ह्यातील पोलीस शिपाई, चालक पदाच्या 139 जागांसाठी 2 जानेवारीपासून मैदानी चाचणीला सुरूवात झाली आहे. मंगळवारी चाचणीसाठी एक हजार मुलांना बोलावण्यात आले होते. पहाटे पाच वाजता मैदानावर चाचणीला सुरूवात झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह अधिकारी, अंमलदार यांनी चाचणी प्रक्रिया सुरू केली.
मंगळवारी चाचणीसाठी 676 उमेदवारांनी हजेरी लावली. सुरूवातीला कागदपत्रे पडताळणी, छाती, उंचीची मोजणी करण्यात आली. यामध्ये 51 जणांना अपात्र ठरविण्यात आले. उर्वरित 625 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. गोळा फेक, 100 मीटर व 1600 मीटर धावणे अशी मैदानी चाचणी पार पडली. बुधवार, गुरूवार या दोन दिवस मुलांसाठी मैदानी चाचणी होणार असून शुक्रवार व शनिवारी मुलींना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तरुणाचे असेही दातृत्व...
पोलीस मुख्यालय परिसरातून जात असताना प्रतीक हिंगडे या तरुणाला काही युवक थंडीच्या कडाक्यात रस्त्याच्या कडेला झोपलेले दिसले. त्यांची विचारपूस केली असता ती मुले भरतीसाठी आल्याचे त्याला समजले. खात्री पटल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता प्रतिकने तेथे झोपलेल्या त्या 11 मुलांची झोपण्याची व्यवस्था केली. ही माहिती त्याने मातोश्री फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक कावळे व अॅड. अशोक गायकवाड यांना दिली. त्यांनी या सर्व मुलांच्या जेवणाची व्यवस्था केली. अनपेक्षित मदतीमुळे सोलापूर, लातूर, औरंगाबाद, जालना, नेवासा, संगमनेर, राहाता, शिर्डी येथून आलेल्या त्या मुलांच्या डोळ्यात पाणी आले. लायब्ररी चालवणार्या प्रतिकने यापूर्वीही करोना काळात अनेक जणांना मदतीचा हात दिला आहे.