संगमनेर (शहर प्रतिनिधी) -

शहरातील बड्या गुटखा विक्रेत्याच्या गोडावूनमध्ये शहर पोलिसांनी काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास छापा टाकला.

या छाप्यात गोडावूनमधून एक लाख 6 हजार 346 रुपयांचा गुटखा जप्त केला असून या गुटखा विक्रेत्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर सहा तासांनतर गुन्हा दाखल करण्यात आला.

संगमनेर शहरात खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. शहरातील अभंग मळा येथे संजय बाबुलाल लुंकड (वय 45) हा आपल्या गोडावूनमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा करत असल्याची व या गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख व त्यांच्या सहकार्यांनी काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास अभंग मळा येथे जाऊन लुंकड याच्या गोडावूनवर छापा टाकला. या गोडावूनमध्ये विविध कंपन्यांचा गुटखा साठविला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी सर्व गुटख्याचा पंचनामा करून हा गुटखा ताब्यात घेतला.

जप्त केलेला गुटखा पोलीस ठाण्यात आणण्यात आला. गुटखा विक्रेता लुंकड यालाही ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत आर.एम.डी., एम. सेंटेड, विमल, हिरा, रॉयल, व्ही वन या कंपन्यांचे गुटख्यांचे पॅकेट जप्त करण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ भानुदास तळेकर यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संजय बाबुलाल लुंकड (रा. अभंग मळा) याच्या विरुध्द भारतीय दंड संहिता 188, 272, 273, 328 यांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

कारवाई 3 वाजता...गुन्हा रात्री 9 वाजता दाखल

संगमनेरातील गुटख्याच्या या गोडावूनवर दुपारी 3 वाजता कारवाई करण्यात आली. गुटख्यासह लुंकड यालाही त्याचवेळी ताब्यात घेण्यात आले. मात्र गुन्हा रात्री उशिरा 9 वाजता दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यास विलंब का लागला याचे कारण मात्र समजू शकले नाही. ताब्यात घेतलेला गुटखा विक्रेता लुंकड याचे शहरात व घुलेवाडी येथे वेगवेगळे व्यवसाय आहे. गुटखा विक्री प्रकरणात लुंकड याच्याविरुध्द कारवाई करण्यात आल्याने शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे.