
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा पोलीस दलातील 1009 पोलीस अंमलदारांच्या पदोन्नतीचा विषय लवकरच मार्गी लागणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली आस्थापना मंडळाची नुकतीच बैठक होऊन पदोन्नतीच्या कक्षेत येणार्या पोलीस नाईक व पोलीस हवालदार यांची सुधारित यादी बुधवारी (दि. 4) रात्री प्रकाशित करण्यात आली आहे. या यादीवर 9 ऑक्टोबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या असून त्यानंतर आस्थापना मंडळाच्या बैठकीत पदोन्नतीचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक (गृह) कमलाकर जाधव यांनी दिली.
जिल्हा पोलीस दलातील 615 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदारपदी तर 394 पोलीस हवालदार यांना सहा.पोलीस उपनिरीक्षकपदी (एएसआय) पदोन्नती दिली जाणार आहे. पदोन्नतीच्या कक्षेत येणार्या पोलिसांची यादी यापूर्वी प्रकाशित करण्यात आली होती. त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. दरम्यान, पदोन्नती देताना कोणत्याही पोलीस अंमलदारांवर अन्याय होऊ नये यासाठी बुधवारी (दि. 4) जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांच्या मार्गदर्शनाखाली आस्थापना मंडळाची बैठक झाली. त्यानंतर पदोन्नती कक्षेत येणार्या पोलीस अंमलदारांची नव्याने यादी प्रकाशित करण्यात आली असून यावर 9 ऑक्टोबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. हरकती प्राप्त झाल्यानंतर आस्थापना मंडळाची बैठक घेतली जाणार असून त्यानंतर पोलीस नाईक व पोलीस हवालदार यांच्या पदोन्नतीचा विषय मार्गी लागणार आहे.
पदोन्नती पात्र पोलीस अंमलदार यांची यादी सर्व पोलीस ठाण्यातील सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे. कोणताही पोलीस अंमलदार पदोन्नतीपासून वंचित राहू नये यासाठी संबंधीत पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी व कंपनी चालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. हजेरी दरम्यान दररोज सूचना देण्याचे आदेश देण्यात आले आहे. 9 ऑक्टोबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या असून त्यानंतर आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही. कोणी पोलीस अंमलदार पदोन्नतीपासून वंचित राहिल्यास व 9 ऑक्टोबर नंतर त्याची काही हरकत असल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्याला जबाबदार धरण्यात येऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही उपअधीक्षक जाधव यांनी सांगितले.