अतिरिक्त अधीक्षक खैरे यांच्यासह सात जणांना पोलीस महासंचालक पदक
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणार्या राज्यातील 800 पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालक पदक देऊन महाराष्ट्र दिनी गौरविण्यात येणार आहे. यात नगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यासह सात जणांचा समावेश आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी बुधवारी ही यादी जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले आहे. नगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस निरीक्षक विजय करे, शिर्डी साई संस्थान येथील पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब परदेशी, पोलीस हवालदार राहुल रघुनाथ बोडखे, बिभीषण काशिनाथ दिवटे, सुनील विनायक पवार, चालक हवालदार दिगंबर भागचंद तनपुरे या सात जणांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. महाराष्ट्र दिनी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार्या समारंभात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.