
वैजापूर (प्रतिनिधी)
रात्रीच्या वेळी पेट्रोलिंगच्या गाडीला हरीण आडवे आल्याने झालेल्या भीषण अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
विठ्ठल बदने असे अपघातात मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून या अपघातात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.वैजापूर तालुक्यातील शिवूर-नांदगाव रस्त्यावर ही भीषण अपघाताची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिवूर-नांदगाव रस्त्यावर शिवूर पोलिसांची गाडी आज पहाटे २ ते ३ वाजे दरम्यान पेट्रोलिंग करून लोणीकडून शिवूरकडे येत असताना शिवुर- नांदगाव रस्त्यावरील राधाकृष्ण मंगल कार्यालय जवळ गाडी समोर अचानक हरणाने उडी मारल्याने चालकाचा ताबा सुटून गाडी झाडावर आदळली.
यात पोलीस कर्मचारी विठ्ठल बदने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर चालक सिद्धेश विधाटे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती शिवुर पोलीस स्टेशनचे एपीआय पाटील यांनी दिली.