संशयास्पद भूमिकेमुळे पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांची तडकाफडकी बदली

मनमानी कारभारामुळे ठरले वादग्रस्त
संशयास्पद भूमिकेमुळे पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांची तडकाफडकी बदली

संगमनेर (शहर प्रतिनिधी) -

आपल्या मनमानी कारभारामुळे वादग्रस्त ठरलेले संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांची

तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तालुक्यातील एका गावातील मिसींग केसमधील संशयास्पद भुमिकेमुळे त्यांच्यावर बदलीची कारवाई झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश निघाले असले तरी काही दिवस संगमनेरात थांबावे असे आदेश वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी त्यांना दिले असल्याचे समजते.

पोलीस निरीक्षक पाटील यांची संगमनेरातील कारकिर्द सातत्याने वादग्रस्त ठरली आहे. पोलीस ठाण्यातील मनमानी कारभार, पोलीस कर्मचार्‍यांसोबतची वर्तणूक व पोलीस ठाण्यात येणार्‍या नागरीकांच्या तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पाटील वादग्रस्त ठरले होते. मिसींग केस त्यांच्या बदलीला कारणीभूत ठरली.

तालुक्यातील एका गावातील मिसींगची केस हाताळतांना मध्यरात्री त्यांची बदली तातडीने पोलीस मुख्यालयात करण्यात आली. राजकीय आशीर्वाद असल्याने बदली होणार नाही अशा अर्विभावात असलेल्या पाटील यांना कुणाचा राजकीय आशीर्वाद लाभला आहे. याबाबत तालुक्यात चर्चा होत होती. तालुक्यातील एका गावातील अंतरजातीय विवाहवरुन रात्री पोलीस ठाण्यात नाट्य घडले. या प्रकरणातील मुलगी बेपत्ता होती. याबाबत पोलीस ठाण्यात मिसींगची केस दाखल झालेली होती. नंतर मुलगा आणि मुलीने लग्न केले. ते स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले. ते कायदेशीर सज्ञान असतांनाही पोलीस निरीक्षक पाटील यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत हे पोलीस ठाण्यात थांबले होते. पोलीस निरीक्षक पाटील त्यांना जावू देत नव्हते. यानंतर काही राजकीय पदाधिकार्‍यांनी पाटील यांना संपर्क करुन या नवदांम्त्यास सोडून देण्यास सांगितले. तरीही ते ऐकायला तयार नव्हते. यानंतर मध्यरात्री हालचाली सुरु झाल्या. मध्यरात्री वरीष्ठ पोलिसांनी तातडीने पाटील यांची बदली करुन तात्पुरता पदभार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्याकडे सोपवला. मध्यरात्री अशी कारवाई होण्याची ही पहिलीच घटना होती.

तालुक्यात एखाद्या पोलीस ठाण्यात बदली करण्यासाठी प्रयत्नशिल असलेल्या पाटील यांची बदली थेट नगरच्या मुख्यालयात करण्यात आली. दिवसभर हा चर्चेचा विषय बनला.

मध्यरात्री बदली आणि दुपारी जैसे थे

पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांची मध्यरात्री तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांचा पदभार तात्पुरता अन्य अधिकार्‍याकडे देण्यात आला. या आदेशामुळे पाटील यांना त्वरीत नगर मुख्यालयात बोलवण्यात येईल असे चित्र होते. मात्र सकाळपासून जोरदार हालचाली झाल्या आणि दुपारनंतर चित्र बदलले. काही दिवस संगमनेरात थांबावे असे पाटील यांना सांगण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या या भूमिकेमुळे उलटसुलट चर्चा सुरु झाली. कुणाच्या राजकीय दबावामुळे तर त्यांनी जैसे थे चे आदेश दिले नसावे ना! अशी शंका उपस्थित केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com