
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महिलेला भररस्त्यात मारहाण केल्याचा प्रकार सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या अंगलट आला आहे. महिलेला मारहाण केल्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यानंतर निरीक्षक गोकावे यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी निरीक्षक गोकावे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
मारहाण झालेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मंगळवारी व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली होती. त्या व्हिडीओमधील व्यक्ती निरीक्षक गोकावे असल्याचा कयास आहे. तसेच त्या व्हिडीओमध्ये एक पोलीस अंमलदारही दिसून येत आहे. तो कोण? याचा तपास सुरू आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे देण्यात आली असल्याचे अधीक्षक ओला यांनी सांगितले.
सुपा टोल नाक्यावर ही घटना घडली आहे. पोलिसांची गाडी सुपा टोल नाक्यावर येऊन थांबली होती. त्या गाडीतून काहीवेळ कोणीच खाली उतरत नाही. काही वेळाने तेथे पुण्याच्या दिशेकडून आलेली एक कार थांबते. कार थांबताच पोलीस गाडीतून एक व्यक्ती खाली उतरून कारमध्ये बसते. थोड्या वेळेने ती व्यक्ती व एक महिला त्या गाडीतून उतरतात व भर रस्त्यावर त्या दोघांत झटापट होते. याकाळात ती महिला व तो व्यक्ती बोलतात व त्यांच्यात चांगलीच बाचावाची होऊन महिलेला मारहाण होत असल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे.
पोलिसांच्या गाडीतील कर्मचारीही तेथे येतो. ते दोघे मिळून त्या महिलेला मारहाण करतात. सदर मारहाण करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तो निरीक्षक गोकावे असल्याचा कयास आहे. दरम्यान सदरची महिला कोण? याची वेगवेगळी चर्चा पोलीस दलात सुरू होती. त्या महिलेला भर रस्त्यात मारहाण करण्याचे कारण काय? याचीही चर्चा सुरू होती. सुपा येथील व्यावसायिक व पोलीस निरीक्षक गोकावे यांच्यामध्ये मागील आठवड्यात जोरदार खडाजंगी झाली होती. यात येथील एका व्यावसायिकासोबत झालेल्या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओची चर्चा थांबत नाही तोच दुसरा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यामुळे निरीक्षक गोकावे यांना निलंबित करण्यात आले आहे.