संगमनेरचे पोलीस निरीक्षक देशमुख व अकोल्याचे निरीक्षक परमार नियंत्रण कक्षात

अधीक्षक पाटील यांचे आदेश
संगमनेरचे पोलीस निरीक्षक देशमुख व अकोल्याचे निरीक्षक परमार नियंत्रण कक्षात

अहमदनगर|Ahmedagar

पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍याला लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याच्या घटना संगमनेर शहर व अकोले पोलीस ठाण्यात लागोपाठ घडल्या.

यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुंकुद देशमुख व अकोले पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांना पुढील आदेश होई पर्यंत नियंत्रण कक्षात हजर राहण्याचे आदेश काढले आहेत. प्रशिक्षणासाठी नियंत्रण कक्षात दोन्ही निरीक्षकांना हजर राहण्याचे आदेश दिले असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. दरम्यान, पोलीस कर्मचारी लाच घेताना पकडले गेल्याने अधीक्षक पाटील यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

पोलीस अधीक्षक पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून मुंकुद देशमुख व अकोले पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून अभय परमार यांची नियुक्ती केली होती. दोन दिवसापूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक बापूसाहेब देशमुख याला एक हजार रूपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत विभागने अटक केली होती. यानंतर काल पुन्हा नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने अकोले पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संतोष वाघ याला 10 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या दोन्ही लाचेच्या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर लगेचच पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दोन्ही पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना नियंत्रण कक्षात आणले आहे. पुढील आदेश होईपर्यंत बंदोबस्त व शासकीय कामकाजाचा करता नियंत्रण कक्षात हजर राहावे असे आदेशात स्पष्ट केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com