सोनई (वार्ताहर) -

नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी देवी मंदिराच्या गाभार्यातील 17 किलो वजनाच्या चांदीची चोरी होऊन

तीन महिने उलटले तरी अद्याप या प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना अपयश आले. गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केलेल्या तपासातही कसलीच प्रगती नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

19 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या चोरीमुळे ग्रामस्थांसह सर्वांना खूप वाईट वाटले आहे. मंदिरातील चोरी होऊन तीन महिने लोटले तरी या चोरीचा छडा लावण्यात अपयश येत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

चोरीनंतर 15 दिवसांनी ग्रामस्थांनी नगर-औरंगाबाद मार्गावर एक तास रास्तारोको आंदोलन केले होते. यावेळी पोलीस अधिकार्यांनी 15 दिवसांत तपास लावण्याचे आश्वासन दिले होते. एक संशयित पकडला असल्याचेही सांगितले होते.

परंतु तो पकडलेला व्यक्ती संशयितच निघाला व मुख्य आरोपी पकडण्याचे आश्वासन हवेत विरले. त्यामुळे हा तपास लागणार की नाही? याची शंका ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. दरम्यान पोलीस खात्यावरील विश्वास टिकवण्यासाठी तरी पोलिसांनी गांभीर्याने घेऊन हा तपास पुन्हा हाताळावा व आरोपींना अटक करून ग्रामस्थांचा पोलीस खात्यावरील विश्वास टिकवावा, अशी मागणी होत आहे.

अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी

घोडेगाव व परिसरात सध्या अवैध धंदे बेफामपणे बोकाळलेले असताना स्थानिक घोडेगावातील बीट नेमणुकीचे पोलीस कर्मचारी व सोनई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हे अवैध धंदे बंद करण्यात अपयशी ठरलेले असल्यानेच या भागात गुन्हेगारी वाढत असल्याचे सांगितले जाते. कर्तव्यदक्ष व धडाडीचे पोलीस अधिक्षकांनी घोडेगाव चोरीचा तपास व अवैध धंद्याबाबत लक्ष घालून यंत्रणा कामाला लावावी,अशी अपेक्षाही ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.