संगमनेर शहर पोलिसांना गटबाजीची लागण; वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज
सार्वमत

संगमनेर शहर पोलिसांना गटबाजीची लागण; वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज

Arvind Arkhade

संगमनेर|शहर प्रतिनिधी|Sangmner

सर्वच क्षेत्रात गटबाजी दिसत असताना आता पोलिसांमध्येही गटबाजी दिसू लागली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गटबाजीची लागण झाल्याची खमंग चर्चा होत आहे. अंतर्गत गटबाजीमुळे पोलिसांचे शहरातील कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. पोलीस निरीक्षकांनी त्वरीत ही गटबाजी थांबवली नाही तर त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाणे हे जिल्ह्यातील महत्त्वाचे पोलीस ठाणे समजले जाते. संगमनेरचा झपाट्याने विकास होत असताना शहरातील गुन्हेगारीही वाढत चालली आहे. पोलिसांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी असली तरी, आहे त्या कर्मचार्‍यांकडून व्यवस्थित काम करून घेण्याची पद्धत पूर्वीच्या पोलीस अधिकार्‍यांनी वापरल्याने शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवता येत होते. आता ही परिस्थिती हळूहळू बदलत चालली आहे. पोलिसांमध्येच ताळमेळ नसल्याने व अधिकार्‍यांचेही दुर्लक्ष होत असल्याने गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांमध्ये अंतर्गत 4 गट पडल्याचे काही पोलीस खाजगीत सांगतात. एखाद्या अधिकार्‍याला हाताशी धरून मनमानी करण्याचे काम काहीजण करत आहे. अहमदनगर येथून बदलून आलेल्या काही कर्मचार्‍यांमुळे ही गटबाजी वाढली असल्याचे बोलले जाते.

अधिकार्‍यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून मर्जीप्रमाणे काहीजण काम करत आहे. शहरातील गुन्हेगारीचा शोध लावण्याचे काम करणार्‍या डीबीतही काही कर्मचार्‍यांनी गटबाजी केली होती. अंतर्गत गटबाजीमुळे भविष्यात पोलिसांमध्येच मोठा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी अशी गटबाजी करणार्‍या पोलिसांना समज देण्याची गरज असल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com