पोलीस हवालदाराने चोर पकडले

मौजमजेसाठी करत होते डाळिंबाची चोरी
जेरबंद
जेरबंद

घारगाव |वार्ताहर| Ghargav

संगमनेर तालुक्यातील बोटा येथे डाळिंब चोरी करुन आलेल्या पैशातून मौजमजा करणार्‍या चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रोहित खंडू नंदकर (वय-19), शैलेश हरिभाऊ नंदकर (वय 19, दोघेही रा. नळावणे ता. जुन्नर, जि.पुणे), समीर रोहिदास बांबळे (वय 19, रा. बांबळेवाडी, डोळासणे, ता. संगमनेर) अशी डाळिंब चोरणारांची नावे आहेत.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बोटा येथे यशवंत शेळके यांनी शेतात डाळिंबाची लागवड केली आहे. या बागेत तोडणीला आलेले डाळिंब चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत मंगळवारी (दि. 16) रात्री सात ते बुधवारी (दि.17) सकाळी सव्वा सहा वाजेच्या दरम्यान डाळिंब चोरून नेले होते. शेळके हे बागेत गेले असता तोडणीला आलेले डाळिंब चोरी गेल्याचे निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांना कळविले. पोलीस हवालदार कैलास देशमुख यांनी घटनास्थळी येऊन डाळिंब चोरी गेल्याची खात्री केली. सुमारे 25 कॅरेट डाळिंब चोरी गेल्याचे शेळके यांनी पोलिसांना सांगितले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, बुधवारी सकाळी हवालदार देशमुख हे यशवंत शेळके, उपसरपंच पांडू शेळके, पोलीस पाटील शिवाजी शेळके यांना सोबत घेऊन आळेफाटा (जि.पुणे) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेले. तेथील व्यापार्‍यांना विचारपूस केली असता, गोण्यांमध्ये आणलेले डाळिंब विकून तिघेजण चेक घेऊन गेल्याचे एका व्यापार्‍याने सांगितले. मात्र, ते डाळिंब विकून चेक घेऊन निघून गेले होते. हवालदार देशमुख यांनी युक्ती लढवली. व्यापार्‍यास सांगितले, चोरांना फोन करून सांगा तुमची पट्टी चुकलेली आहे,

तुमचे पैसे वाढत आहे ते घेऊन जा. व्यापार्‍याने असे सांगताच वरील दोघे पुन्हा चेक नेण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांस ताब्यात घेतले. बोटा येथून समीर यास ताब्यात घेतले. एकजण फरार झाला आहे. वरील तिघांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. पोलिसी खाक्या दाखवताच केवळ मौज मजेसाठी आम्ही डाळिंबाची चोरी केली असल्याचे त्यांनी सांगितले. वरील तिघांनाही घारगाव पोलिसांनी गुरुवारी दुपारी संगमनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यात पोलिसांनी एक कार जप्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com