पोलिसांनी बालविवाह रोखला
सार्वमत

पोलिसांनी बालविवाह रोखला

जेऊर कुंभारीची वधू-घुलेवाडीचा वर दोघांचेही वय कमी, आई-वडिलांवर गुन्हा दाखल

Arvind Arkhade

सोनेवाडी|वार्ताहर|Sonewadi

मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी व मुलाचे वय 21 पेक्षा कमी असतानाही होत असलेला बालविवाह कोपरगाव पोलिसांनी हस्तक्षेप करत थांबविला. ही घटना काल रविवारी घडली. या वधू-वराच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालविवाह ठरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती पुढे आली.

शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेऊर कुंभारी भागात एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (26जुलै) सकाळी 11 वाजेच्या सुमारास स.फौ.शैलेंद्र गंगाधर ससाणे पोकॉ संदीप शांताराम काळे, क्लार्क आनंद बारसे पोलीस पाटील बाबासाहेब मगनराव गायकवाड यांनी तातडीने या भागात धाव घेत संबंधितांची चौकशी केली. मुलीच्या घराजवळ असलेल्या महादेव मंदिरासमोर 15 फुट रुंदीचा व 30 फुट लांबीचा मंडप टाकलेला होता व त्यात काही महिला नवीन साड्या व दागीने घालून बसलेल्या दिसल्या.

सदर मंडपामध्ये मुलीच्या आईवडिलांकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावर आमच्या मुलीचा विवाह संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीतील तरूणाशी ठरला आहे. त्याकरीता मुलाचे आईवडिल तयार असून आज आम्ही लग्न करुन देणार आहोत.

मुलीचे वय 16 वर्षे 7 महिने 26 दिवस असल्याने ती अल्पवयीन आहे ती तसेच नवरदेवाचेही वय 18 वर्षे 11 महिने असल्याने त्यास 21 वर्षे पूर्ण नसतानाही मुलीचे व मुलाचे आई वडील लग्न करण्यास तयार झाले होते. सदरची बाब ही बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा भंग करणारी असल्याने जेऊर कुंभारीचे मुलीचे आई-वडील आणि घुलेवाडीच्या नवरदेवाचे आईवडिल यांच्या विरुध्द पोलीस पाटील बाबासाहेब मगनराव गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.एस.जी.ससाणे पुढील तपास करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com