शास्त्रज्ञांवर हल्ला करणारा सहायक सुरक्षा अधिकारी गजाआड
सार्वमत

शास्त्रज्ञांवर हल्ला करणारा सहायक सुरक्षा अधिकारी गजाआड

या प्रकरणी चार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Sarvmat Digital

राहुरी| तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापकावर खुनीहल्ला करून पसार झालेल्या घटनेतील मास्टरमाइंड ठरलेला विद्यापीठाचा सहायक सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ रघुनाथ शेटे यास राहुरी पोलिसांनी गजाआड केले.

गेल्या 19 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील रवींद्र कॉलनीजवळ चार अज्ञात इसमांनी विद्यापीठाचे प्रा. डॉ. राहुल नवनाथ देसले यांच्यावर हल्ला करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.

ही घटना अतिशय संवेदनशील असून हल्लेखोरांविषयी कोणतीही माहिती मिळत नसल्याने अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह व श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी हल्लेखोरांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभागाचे राहुल मदने व राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना दिल्या होत्या. त्या अनुषगाने हल्लाखोरांना शोधण्याकरिता पोलीस स्टेशन स्तरावर पोलीस पथके रवाना करण्यात आली होती.

हल्लेखोरांनी गुन्हा करताना कोणताही पुरावा शिल्लक ठेवला नसल्याने त्यांना शोधून काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, अधिकार्‍यांनी अतिशय कुशलतेने तपास करून घटनेतील आरोपी भास्कर उर्फ माणिक नानासाहेब काचोळे यास घटना घडल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. परंतु त्यास पोलिसी खाक्या दाखविताच त्याने संपूर्ण घटनाक्रम राहुल मदने, मुकुंद देशमुख यांच्यासमोर कबूल केला.

त्यानुसार शेटे याच्या सांगण्यावरून भास्कर उर्फ माणिक नानासाहेब काचोळे, तौफीक जमील देशमुख व परवेज सय्यद अशा चारही आरोपींनी हल्ला केला असल्याचे उघड झाले आहे. काचोळे यास पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कटाचा प्रमुख सुत्रधार असलेला शेटे हा पसार झाला होता. त्यास काल पोलीस पथकाने अतिशय परिश्रम घेऊन पकडले असून त्यास अटक करण्यात आली आहे.

ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके, पोना. दिनकर चव्हाण, पोना. सोमनाथ जायभाये, पोहेकॉ. ज्ञानेश्वर पथवे, पोकॉ. सचिन ताजणे, पोकॉ. रोहित पालवे यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com