शिर्डीतील हॉटेलमध्ये विवाह सोहळ्यात चोरी करणारे पोलिसांच्या ताब्यात

शिर्डीतील हॉटेलमध्ये विवाह सोहळ्यात चोरी करणारे पोलिसांच्या ताब्यात

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरातील एका हॉटेलमध्ये मालेगाव आणि औरंगाबाद येथील कुटुंबातील विवाहसोहळ्यातून सुमारे 2 लाख 50 हजार रुपये चोरी करून पसार झालेल्या उत्तरप्रदेश येथील दोघा जणांना काश्मिरा पोलिसांनी अटक केली असून ठाणे पोलीस लवकरच या दोन्ही आरोपींना शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डी शहरात राज्यातील मोठमोठे शाही विवाहसोहळ्यांचे आयोजन करण्यात येते. अशाप्रकारच्या शाही सोहळ्यातून अनेकदा रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

फिर्यादी युवराज अमृतलाल जैन यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शिर्डीतील नगर मनमाड लगत असलेल्या हॉटेल शांतीकमल येथे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील जैन व औरंगाबाद येथील सुराणा परिवारातील लग्नसोहळा सुरू असताना इतरत्र खर्चासाठी नवरदेवाच्या वडिलांनी नातेवाईक युवराज जैन याच्याकडे दोन लाख पन्नास हजार रुपये ठेवण्यासाठी दिले होते. सदर रक्कम चॉकलेटी रंगाच्या बॅगमध्ये ठेवलेली होती.

6 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान संगीताचा व हळदी समारंभ सुरू असताना आम्ही सर्व खुर्च्यांवर हॉटेलमध्ये बसलेलो होतो. माझ्याजवळ असलेली पैशाची बॅग माझ्या शेजारील खुर्चीवर मी ठेवली होती. यादरम्यान नातेवाईकांबरोबर गप्पांच्या नादात या बॅगवरून माझे थोडेसे दुर्लक्ष झाले होते. त्यानंतर काही मिनिटात बॅगकडे लक्ष गेले असता खुर्चीवरून बॅग गायब झालेली दिसली. ही बाब तातडीने मी नातेवाईकांनाही सांगितल्यानंतर बॅगचा शोध घेतला मात्र बॅग कोठेही मिळाली नाही.त्यामुळे बॅग चोरी झाल्याची खात्री झाल्यावर मी शिर्डी पोलीस ठाण्यात धावत घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध अडीच लाख रुपये चोरून नेल्याची फिर्याद दाखल केली होती.

याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल मधील सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले असता यामध्ये दोन संशयित तरुण हातात बॅग घेऊन जाताना दिसून येत असल्याने त्यांचा शोध सुरू होता.या दोघांनी शिर्डी तसेच नाशिक आणि ठाणे येथील विवाह सोहळ्यात अशाचप्रकारे चोरी केली असून या दोघांनाही ठाणे पोलिसांनी अटक केले आहे. हे दोघेही उत्तरप्रदेश येथील रहिवासी आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com