‘त्या’ 228 पोलीस अंमलदारांच्या होणार बदल्या

एकाच ठिकाणी पाच वर्षे पूर्ण || हालचालींना वेग
‘त्या’ 228 पोलीस अंमलदारांच्या होणार बदल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या बदली प्रक्रियेच्या हालचालींना वेग आला आहे. ज्या पोलीस अंमलदारांना 31 मे, 2022 रोजी एका पोलीस ठाण्यात पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत, असे पोलीस अंमलदार सर्वसाधारण बदल्यांकरिता पात्र आहेत. जिल्हा पोलीस दलातील 228 अंमलदारांनी संबंधित पोलीस ठाण्यात पाच वर्षे पूर्ण केली असल्याने त्यांची बदली होणार आहे.

जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करणार्‍या पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण बदल्या मे महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. बदलीपात्र पोलीस अंमलदारांकडून तीन पसंतीची ठिकाणे नमूद करून तसे विनंती अर्ज मागविण्यात आले होते. बदली पात्र 228 अंमलदारांची यादी आस्थापना विभागाने जाहीर केली आहे. प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीमध्ये नाव नसलेल्या व पोलीस ठाण्यात 31 मे, 2022 रोजी पाच वर्षे पूर्ण झालेल्या अंमलदारांची नावे आस्थापना विभागाला कळविण्याचे आदेश प्रभारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

अनेक अंमलदार एकाच पोलीस ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसले आहेत. करोनामुळे त्यांना दोन वर्षे आणखी मुदतवाढ मिळाली. यंदा करोनाचे सावट नसल्याने पारदर्शक आणि बदलीपात्र सर्व अंमलदारांच्या बदल्या केल्या जाणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे बदलीपात्र अंमलदारांनी सोयीचे पोलीस ठाणे पदरात पाडून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पाच वर्षे पूर्ण होऊन देखील वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेल्या अंमलदारांना यंदा मात्र दुसर्‍या पोलीस ठाण्यात बदलून जावे लागण्याची शक्यता आहे. अधीक्षक पाटील यांच्याकडून तसे आदेश काढण्यात आले आहे. आदेशाप्रमाणे बदली प्रक्रिया पार पडल्यास अनेकांची पंचायत होणार आहे.

नागपूर पॅटर्न राबविल्यास...

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी नागपुरात पोलिसांच्या पारदर्शक बदल्या केल्या. पाच वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या पसंतीच्या तीन जागा विचारण्यात आल्या. बदलीपात्र अंमलदारांना एकाच वेळी एका हॉलमध्ये बोलविण्यात आले. त्या हॉलमध्ये दर्शनी भागात लावलेल्या बोर्डावर पोलीस ठाणे आणि शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांची माहिती दिली. प्रत्येक पोलीस अंमलदाराला समोर बोलून त्याच्या पसंतीच्या जागा विचारत उपलब्ध जागेप्रमाणे बदल्या देण्यात आल्या. पोलीस अंमलदारांच्या पहिल्या तीन पसंतीप्रमाणे जागा शिल्लक राहिलेल्या नसताना, त्यांना उपलब्ध जागेप्रमाणे तिथेच नव्या पसंती विचारून शंभर टक्के पारदर्शकतेने बदल्या केल्या. अहमदनगर जिल्हा पोलीस दलात नागपूर बदली पॅटर्न राबविण्याची मागणी पोलीस अंमलदारांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.