पारनेर : पोखरीचा कोतवाल लाचेच्या जाळ्यात
सार्वमत

पारनेर : पोखरीचा कोतवाल लाचेच्या जाळ्यात

तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Sachin Daspute

Sachin Daspute

अहमदनगर ।प्रतिनिधी। Ahmednagar

मयत आजोबांच्या शेतीला वारस म्हणून नोंद लावण्यासाठी तक्रादराकडून तीन हजार रूपयांची लाच स्वीकारताना पारनेर तालुक्यातील पोखरीच्या कोतवालास लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले. गोरख निवृत्ती बर्डे (वय- 48) असे या कोतवालाचे नाव आहे. नगरच्या लाचलुचपत पथकाने मंगळवारी दुपारी टाकळी ढोकेश्वर येथे ही कारवाई केली.

राजुरी (ता. जुन्नर) येथील तक्रारदार यांच्या मयत आजोबांच्या शेतीला तक्रारदार यांचे मामा, आई व मावशी यांचे नाव वारस म्हणून लावण्यासाठी त्यांनी पोखरी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. परंतू, तक्रारदार यांच्या अर्जांवर पोखरी तलाठी हे कारवाई करत नव्हते. यामुळे तक्रारदार यांनी कोतवाल बर्डे यांच्याशी संर्पक साधला.

तलाठी यांच्याकडून काम करून देण्यासाठी कोतवाल बर्डे याने तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रूपये लाचेची मागणी केली. मंगळवारी दुपारी टाकळी ढोकेश्वर येथे तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना कोतवाल बर्डे याला नगर लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले. लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com