विषारी दारू पाजल्याने तरूणाचा मृत्यू

भिंगार : चार वर्षांनंतर वैद्यकीय अहवाल प्राप्त; खुनाचा गुन्हा
विषारी दारू पाजल्याने तरूणाचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भिंगारमधील मोमीन गल्लीच्या काटवनात झालेला मृत्यू हा मारहाणीत मार लागल्याने व विषारी दारू पिल्याने झाल्याचा अहवाल

वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिला आहे. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तब्बल चार वर्षांनंतर हा प्रकार भिंगार पोलिसांनी उघडकीस आणला. रमेश उर्फ रमाकांत खबरचंद काळे (रा. द्वारकाधीश कॉलनी, आलमगीर, भिंगार) असे मृताचे नाव आहे. भिंगार कॅम्पचे पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जावेद रौफ शेख (रा. मोमीन गल्ली, भिंगार) व त्याचे तीन साथीदार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जावेद शेख याला अटक केली आहे.

माझी बकरी मेली आहे. ती तुम्हाला देतो, असे सांगून मोमीन गल्लीतील जावेद रौफ शेख याने रमेश ऊर्फ रमाकांत खबरचंद काळे व त्याची पत्नी वंदना (रा. द्वारकाधीश कॉलनी, आलमगीर) या दोघांना दुचाकीवर बसून काटवनात नेले.

तेथे रमेश काळे यास बळजबरीने दारू पाजली. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर जखमी रमेश काळे याला उपचारासाठी नगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. भिंगार कॅम्प पोलिसांनी 22 फेबु्रवारी 2017 रोजी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

अनेक दिवस तपास सुरू असताना अकस्मात मृत्यूसंदर्भात पोलिसांनी पुन्हा शवविच्छेदन करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांचा अहवाल मागविला. मृतास झालेल्या मारहाणीत मार लागल्याने तसेच दारूमध्ये विषाचे अंश आढळून आल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी अहवालामध्ये म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. त्यात ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी स्वत: फिर्याद होत खुनाचा गुन्हा दाखल केला. भिंगारचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील हे अधिक तपास करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com