
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे सोमवारी मध्यरात्री अंबिका इलेक्ट्रिकल्स अँड मोटार रिवायडींगचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून किंमती वस्तू लंपास केल्या. याबाबतची खबर शिर्डी पोलिसांना देण्यात आली. मात्र पोलिसांनी घटनास्थळी येण्याचे टाळले. त्यामुळे व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला.
ग्रामपंचायतीच्या योगेश्वर व्यापारी संकुलनात किशोर गोरक्षनाथ शिरोळे यांचे जय अंबिका इलेक्ट्रिकल्स अँड मोटार रिवायडींगचे दुकान आहे. या दुकानात शेतकर्यांसाठी विद्युत मोटारी, इलेक्ट्रिक वस्तू व जुन्या विद्युत मोटारी भरण्यासाठी लागणारी वायडिंग वायर विक्रीसाठी व दुरुस्तीसाठी ठेवलेल्या होत्या. रविवारी संध्याकाळी शिरोळे दुकान बंद करून घरी गेले. रात्री अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून त्यांचे दुकान फोडले.
यामध्ये तीन मिक्सर, तीन फॅन, विंधन विहिरीवर वापरणारी बोअर मोटार, तीन पाणबुडी विद्युत मोटारी, दुरुस्तीसाठी आलेली मोनोब्लॉक मोटार व मोटार रिवायडींगसाठी आणलेली 55 किलो वाइंडिंग वायर असा जवळपास दीड लाख रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यानी लंपास केला.
सकाळी घटना लक्षात आल्यावर शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. मात्र दिवसभर शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी किंवा कर्मचारी त्याठिकाणी फिरकले नाहीत. शेवटी त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशन गाठलं असता त्यांनाच चोरी गेलेल्या वस्तूचे बिल आणण्याची सूचना करण्यात आली. बिल आणल्यानंतरच सदर दुकानाचा पंचनामा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र यामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे.