
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi
कोपरगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस नव्हता. हवामान खात्याचा अंदाजही कोपरगाव तालुक्यासाठी चुकीचा ठरत होता. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हंगामी पिकांची पेरणी केली आहे. मात्र आता पावसाची वाट बघण्याशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी संकटात सापडला होता.
यातच दोन दिवसांपूर्वी पोहेगाव येथील पंचकेश्वर मळा शिवारात निवृत्ती औताडे आणि ज्ञानेश्वर औताडे यांच्या अंगणात चक्क मोराने येत त्यांच्या कुटुंबाच्या समोरच पिसारा फुलवत थुई थुई नाच केला होता. मोर अंगणी नाचून दमदार पावसाची चाहूल देऊन गेला जुन्या जाणकार औताडे मंडळींनी सांगितले.
या मोराने केलेल्या नृत्य आणि दिलेली पावसाची चाहूल सत्यात उतरली.कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव परिसरासह अनेक भागात गुरुवारी संध्याकाळी सात ते नऊ व काल शुक्रवारी दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत दमदार पाऊस बरसला.
पावसाने खूप दिवसाची ओढ दिल्यानंतर पावसाने बरसने सुरू केल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. मोराने औताडे यांच्या अंगणात नृत्य करत शेतकऱ्यांना पावसाचे आगमन लवकरच होईल असा सुखद संकेत दिला होता.
पोहेगांव येथे अंगणात नाचून पाऊस येणार असल्याची चाहूल दिलेला मोर निघून गेला. मात्र दोन दिवसांपासून पाऊस पडल्याने सार्वमतच्या बातमीची सर्वत्र चर्चा होत होती.