
रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव-देर्डे कोर्हाळे रस्त्यावरील खडकी नाल्यावरील पूल पावसाच्या पाण्याने व नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग निर्मितीच्या वाहतुकीमुळे खचला होता. त्यामुळे या परिसरातील शालेय मुलामुलींना तसेच अन्य प्रवाशांना वाहतुकीस मोठी अडचण तयार झाली होती. त्यासाठी माजी उपाध्यक्ष अरूण येवले यांनी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, तहसीलदार विजय बोरूडे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यास यश आले असून नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग निर्मितीच्या अधिकार्यांशी युवानेते विवेक कोल्हे यांनी संपर्क साधून त्याची दुरूस्ती करून घेतली.
नव्याने नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग तयार करण्याच्या कामासाठी मुरूम, माती, डबर आदी साहित्याची ने-आण करण्यासाठी पोहेगाव-देर्डे कोर्हाळे पंचक्रोशीत मोठमोठ्या डंपरमार्फत वाहतूक सुरू आहे. त्यातच चालूवर्षी पावसाळ्याची तिव्रता वाढल्याने या परिसरातील पोहेगाव-देर्डे कोर्हाळे रस्त्यामध्ये असलेल्या खडकी नाल्यावरील पूल नादुरूस्त झाला. त्याच्या अंतर्गत नळ्या गाळामुळे पूर्णपणे बंद झाल्या. परिणामी या पुलावरून पावसाचे पाणी वाहत होते. त्यामुळे या परिसरातून ये-जा करणार्या मुलामुलींची अडचण तयार झाली.
त्याबाबत अरुण येवले यांनी या रस्त्याची अडचण प्रामुख्याने जाणून घेत त्याच्या दुरूस्तीसाठी युवानेते विवेक कोल्हे यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला. हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. याप्रसंगी अरूण येवले यांच्यासह राजेंद्र गवळी, भाऊसाहेब डुबे, अण्णासाहेब कोल्हे, राजेश डुबे, राजेंद्र गव्हाणे, विठ्ठल डुबे, प्रशांत शिलेदार, रवींद्र गव्हाणे, रामनाथ डुबे, संदिप डुबे आदी उपस्थित होते.