एका बैलाच्या साह्याने चार एकर शेतीची संपूर्ण मशागत

निमगावजाळीच्या कोरडवाहू तरुण शेतकर्‍यांची प्रेरणादायी यशोगाथा
एका बैलाच्या साह्याने चार एकर शेतीची संपूर्ण मशागत

लोणी| Loni

निळवंडे धरणाच्या पाण्याची वाट बघत दोन पिढ्यांनी डोळे मिटले. सतत दुष्काळाच्या झळा सोसत तरुणाई होरपळून निघाली. पोटासाठी मिळेल तिथे कामासाठी वणवण करायची वेळ आली. विहीर खोदाईचे काम करण्यात बापाचे आयुष्य लोटले. बदल घडवेल असा आशेचा कुठलाच किरण दृष्टीला पडत नसताना संगमनेर तालुक्यातील कोरडवाहू भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या निमगावजाळीच्या रवींद्र विठ्ठल वदक या तरुणाने आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा दृढनिश्चय केला आणि नव्या वाटांचा शोध घेतला.

एकाच बैलाच्या मदतीने वडिलोपार्जित चार एकर शेतीची संपूर्ण मशागत करण्याबरोबरच त्याच बैलाच्या साह्याने जनावरांसाठी चारा, खाद्य, पाणी आणण्याचा यशस्वी प्रयोग केला. जिथे पिण्यासाठी पाणी दूरवरून आणावं लागतं तिथला हा तरुण वर्षाला छत्त्तीस हजार लिटर दूध डेअरीला घालतोय. दूध आणि शेती यातून वर्षाकाठी सुमारे दहा लाखांची आर्थिक उलाढाल करतोय.

निमगावजाळी गावाच्या डोंगर पायथ्याशी असलेला गोरक्षवाडी भाग म्हणजे कितीही पाऊस पडला तरी पाण्याचे दुर्भिक्ष काही संपत नाही. शेती पिकेलच याची खात्री नाही. इथले लोक शेतीवर पूर्णपणे अवलंबून न राहता इतर व्यवसाय करून उदरनिर्वाह करण्याकडे वळले आहेत. याच ठिकाणी राहणारे विठ्ठल पुंजाजी वदक यांना वडिलोपार्जित चार एकर कोरडवाहू शेती. पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असे कुटुंब त्यांच्यावर अवलंबून. शेतीवर पोट भरत नसल्याने विहिरी खोदण्याचे काम त्यांनी अनेक वर्षे केले. निमगावजाळी, चिंचपुर, दाढ, लोणी, हसनापूर, दुर्गापूर अशा अनेक गावातील शेतकर्‍यांच्या विहिरी खोदण्याचे काम करताना अनेकदा जीवही धोक्यात घातला. निळवंडे धरणाचे पाणी आले तर सुखाचे चार घास पोटात जातील या अपेक्षेने आयुष्य घालवले मात्र फक्त कानावर घोषणाच आल्या.

दोन्ही मुलींचे विवाह केले. मुलगा रवींद्र बारावीपर्यंत शिकला पण वडिलांना मदत व्हावी म्हणून शिक्षण अर्धवट सोडून दिले. वारकरी कुटुंब असल्याने रवींद्रवर तसेच संस्कार झाले. त्याला भजनाची आवड लागली. वडिलांनी त्याचा हट्ट पुरवत त्याला आळंदी येथे शिक्षणासाठी पाठवले. तीन वर्षे शिक्षण घेऊन रवींद्र मृदुंग विशारद झाला. घरी आला आणि वडिलांना कामात मदत करीत परिसरात कीर्तन, भजनात मृदंग वाजवू लागला. आता तो नामांकित किर्तनकाराना साथ करतोय.

एकीकडे आवड आणि दुसरीकडे जगण्याची लढाई. वडिलांसोबत रवींद्र आपल्या बहिणीच्या घरी पुणे जिल्ह्यात गेला. तेथुन त्यांच्या एका नातेवाईकांकडे गेले असता त्यांना एका बैलाच्या मदतीने नांगरट सुरु असल्याचे दिसले. त्यांच्याकडून माहिती घेतली आणि आपणही याच पद्धतीने शेतीची मशागत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बैल घेतला. एक बैलासाठी लागणारी विशिष्ट प्रकारची औजारे बनवून घेतली. रवींद्रचा विवाह झाला. त्याच्या कुटुंबात आता आई-वडील आणि ते दोघे पती-पत्नी असे चार जणांचे कुटुंब आहे. एका बैलाच्या साह्याने रवींद्र चार एकर शेतीची नांगरट, काकरी-पाळी, पेरणी ही सर्व कामे एकटा करतो. गेल्या दहा वर्षात त्यांच्या शेतात ट्रॅक्टर आणावा लागला नाही. बैल टायरच्या बैलगाडीतून अठरा गायींना लागणारा चारा शेतातून आणि आजूबाजूच्या गावातून आणतो. पाणी टंचाईच्या काळात मिळेल त्या ठिकाणाहून बैलगाडीत पाण्याची टाकी ठेऊन पाणीही आणतो. पिकाची काढणी झाल्यावर धान्य व इतर सर्व गोष्टी या एकाच बैलाच्या साह्याने आणल्या जातात.

वदक यांचा हा बैल म्हणजे त्यांचा मुख्य आधार आहे. त्याच्यावर हे कुटुंब माणसाप्रमाणे प्रेम करते. रवींद्र या एका बैलाच्या मदतीने चार दिवसात एक एकर जमिनीची नांगरट करतो. त्यासाठी त्याला सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन तास काम करावे लागते. शेतात गेल्यावर तिथेही तो आपली भूक भागवतो. घरी आल्यावर गायींप्रमाणे कसदार चारा त्याला लागत नसल्याने जे असेल ते खाऊन राहतो.

रवींद्र याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी एक बैलाच्या मदतीने आतापर्यंत अठरा लहान-मोठ्या गायीचा गोठा उभा केला आहे. दररोज शंभर लिटर दूध तो डेअरीला घालतो. वर्षाकाठी 36 ते 40 हजार लिटर दूध विक्रीतून त्याची दहा लाखांची उलाढाल होते. शेतीत चारा पिकांसह खरीप, रब्बीची पिके घेतानाच भाजीपाला लागवडही करतो. करोना काळात त्याने गोगलगाव, लोहारे, निमगावजाळी, औरंगपूर, सादतपुर आदी गावांमध्ये दलित, आदिवासी कुटुंबांना स्वस्तात भाजीपाला पुरवला.

दिवसभर काबाडकष्ट करून रात्री नऊ वाजता झोपायचे आणि पहाटे चार वाजता उठून पुन्हा कामाला लागायचे हा या कुटुंबाचा नित्यनेम आहे. परिस्थिती प्रतिकूल आहे म्हणून निराश होऊन रडत बसण्यापेक्षा नव्या वाटा शोधून पुढे जायला हवे असे सांगताना रवींद्र म्हणतो की, ज्याची कष्ट करण्याची तयारी आहे तो अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र यासाठी प्रेरणादायी असल्याचे त्याने सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com