पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी 31 जुलैपर्यंत मुदत
सार्वमत

पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी 31 जुलैपर्यंत मुदत

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी : जास्तीतजास्त शेतकर्‍यांना सहभागी होण्याचे आवाहन

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

नैसर्गिक आपत्ती व पर्जन्यमानातील अनियमितता यामुळे कृषी उत्पन्नात घट होऊन शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होते. यामुळे शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जास्तीतजास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकर्‍यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी, म्हणून गाव पातळीवर कार्यान्वित आपले सरकार सेवा केंद्र सुविधा केंद्राचा वापर करावा. पीक विमा संरक्षण मिळविण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेत 31 जुलैपर्यंत जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनीही पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. खरीप 2020 पासून सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतकर्‍यांनी आपले फोटो असलेल्या बँक खाते पुस्तकाची प्रत तसेच आधार कार्डाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.

आधारकार्ड उपलब्ध नसल्यास नोंदणी पावती सोबत पुढील पैकी कोणतेही एक फोटो ओळख पत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच मतदान ओळखपत्र, किसान क्रेडिट कार्ड, नरेगा जॉब कार्ड, वाहन चालक परवाना यापैकी एक आवश्यक आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकर्‍यांनी बँकेच्या कर्ज खात्याशी आधारकार्ड क्रमांक जोडण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा.

हा पीक विमा अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ पिकांसाठी असेल. पंतप्रधान पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छिक आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदार व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ज्या पिकांसाठी विमा कंपनीने वास्तवदर्शी दराने विमा हप्ता दर 30 टक्क्यांपेक्षा जास्त नमूद केला आहे, त्या पिकांसाठी वाढीव विमा हप्ता अनुदान भार राज्य शासनावर राहणार आहे.

शेतकर्‍यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी दीड टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मार्यादित ठेवण्यात आला आहे.

या योजने अंतर्गत खरीप हंगामासाठी हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी किंवा पिकांची लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामाध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पेरणीपासून पीक काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांची होणारी काढणी पश्चात नुकसान यासाठी भरपाई मिळणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com