पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांची पिडा पारखणारे खरे जवाहीर - ना. कपिल पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांची पिडा पारखणारे खरे जवाहीर - ना. कपिल पाटील

बेलापूर |वार्ताहर| Belapur

हिरा पारखण्यापेक्षा पिडा पारखणारा माणुस खरा जवाहिर असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरगरीब लोकांची पिडा पारखली म्हणुन ते खरे जवाहिर आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वयोश्री योजनेच्या माध्यमातून 60 वर्षांपुढील कोट्यवधी ज्येष्ठ नागरिकांना आत्मविश्वासाने जगण्याची उभारी मिळाली आहे.या योजनेला केंद्र सरकारने हजारो कोटी रुपयांचा निधी दिल्याने देशातील जनतेला मोठा विश्वास मिळाला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायती राजमंत्री कपिल पाटील यांनी केले.

बेलापूर बु॥ येथे केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेअंतर्गत 60 वर्षांपुढील 717 दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना व्हील चेअर, चष्मे, वॉकिंग स्टिक, दातांची बचळी, कुबड्या आदी चौदा प्रकारच्या साहित्याचे वाटप मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आणि नगरचे भाजप खा. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आले, त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते.

खा. डॉ. सुजय विखे यांच्या प्रयत्नाने आणि जि. प. सदस्य शरद नवले यांच्या विशेष प्रयत्नातून बेलापूर गटातील 717 ज्येष्ठ नागरिक दिव्यांग लाभार्थ्यांना आज उपयुक्त साहित्याचे ना. पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तत्पुर्वी पाटील यांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन नंतर ग्रामपंचायत कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

पाटील पुढे म्हणाले की, पंचायत राजच्या माध्यमातून केंद्र सरकारने ग्रामीण भागाच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद केली. त्यांनुसार निधीही राज्यांना पाठविला. मात्र महाराष्ट्र सरकारने तो अ‍ॅम्ब्युलन्स खरेदीसाठी वापरला.त्यांनी राज्य सरकारने तो खर्च केल्याचे सांगितले. मात्र ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तो वापरलेला निधी संबंधित ग्रामपंचायतींना व्याजासह परत करण्यात यावा अशा सुचना केंद्राने केल्या आहेत. बिगर भाजप सरकार ग्रामपंचायतींना तो निधी न देता खात्यावर पडुन देत त्यावर व्याज कमवित असत .त्यामुळे येथुनपुढे पंचायत राजचा निधी राज्य सरकारच्या खात्यात 10 दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवल्यास त्यावर व्याज आकारण्यात येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच काश्मीरसह देशातील विविध राज्यांना पंचायत राजच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणुन तळागाळातील भागांमध्ये विकास साधण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

डॉ. सुजय विखे आपल्या भाषणात म्हणाले की, देशाला एक संवेदनशील पंतप्रधान लाभल्याने देश सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. जोपर्यंत त्यांच्यासारखे सक्षम नेते आहेत तोपर्यंत देशवासियांना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त करीत 2024 मध्येही जनतेने मोदींच्या नैतृत्वाची गरज ओळखून त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

यावेळी सर्वश्री माजी सभापती दीपक पटारे, नानासाहेब शिंदे, ग्गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे, गणेश मुदगुले,नानासाहेब पवार, भाजपचे नेते प्रकाश चित्ते, सुनिल मुथा, नितीन दिनकर, बबनराव मुठे, मारुती बिंगले, प्रफुल्ल डावरे, पुष्पा हरदास, जिल्हा समाज कल्याण अधिकारी साळवे, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, बाळासाहेब तोरणे, सुधाकर खंडागळे, बेलापूर खुर्दचे उपसरपंच अ‍ॅड. दिपक बारहाते, इस्माईल शेख आदींसह ग्रामपंचायत सदस्य, नागरिक, गावकरी मंडळाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

भविष्यात खा. विखेंना मोठी संधी- ना. पाटील

खा. डॉ. सुजय विखे पा. हे नगर जिल्ह्यातील लोकांची पिडा पारखणारे खरे जवाहिर आहेत त्यांनी नगर जिल्ह्यात वयोश्री योजनेत मोठे काम करीत 40 कोटींचा निधी गरजूंपर्यंत साहित्याच्या द्वारे पोहोचविला त्याबद्दल त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक स्वतः पंतप्रधान मोदींनी केले. त्यामुळे त्यांना भविष्यात देशपातळीवर काम करण्याची संधी मिळेल असे सूतोवाच ना. पाटील यांनी यावेळी केले.

निधी कमी पडू देणार नाही - ना. पाटील

जि. प. सदस्य शरद नवले यांनी प्रास्ताविक भाषणात गावाच्या विकासासाठी अपेक्षित निधी मिळण्याची विनंती केली. त्यावर मंत्री पाटील यांनी बेलापूर गावाच्या नावातच पुर असल्याने गावाच्या विकासासाठी निधीची कमी पडु देणार नाही असे सांगत नवले यांना आश्वस्त केले.

Related Stories

No stories found.