
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
गुरूवारी जिल्हा दौर्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी नागरिकांना शिर्डीला घेऊन जाणार्या एसटी महामंडळाच्या बसेस मराठा आरक्षणासाठी लढा देणार्या कार्यकर्त्यांनी अडवत रिकाम्या केल्या. नगर दक्षिणेतील शेवगाव, कर्जत आणि नगर शहरात हा प्रकार घडला. मातापूर येथेही सभेला कुणीही जाऊ नये असा फलक लावण्यात आला होता. तर आरक्षणाला विरोध करणार्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा पुतळा पाथर्डी जाळण्यात आला.
गुरूवारी पंतप्रधान मोदी यांची शिर्डीला सभा होणार होती. यासभेला नागरिकांना उपस्थित राहता यावे, यासाठी भाजपच्यावतीने एसटी महामंडळासह खासगी बसेस ठेवण्यात आल्या होत्या. दुसरीकडे मराठा आरक्षणावर चिडलेल्या समाज बांधवांनी या बसेसला आपले लक्ष करत अनेक ठिकाणी या बसेस अडवत त्या रिकाम्या करून तो सोडून दिल्या. शेवगाव तालुक्यातील मंगरूळ या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी एका एसटी बसच्या काचा फोडल्या. तर हसनापूर, ढोरजळगाव, कोळगाव, अंतरावली या ठिकाणी एसटीमधून शिर्डीला सभेसाठी जाणार्यांना उतरवून घेत रिकाम्या गाड्या पाठवण्यात आल्या. श्रीरामपूर तालुक्यातील मातापूरच्या ग्रामस्थांनीही पंतप्रधान मोदींच्या सभेवर बहिष्कार घातला होता. येथे आलेली बसही रिकामी पाठविण्यात आली.
जामखेडमध्ये मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला असून याठिकाणी कालपासून प्रत्येक गावाने साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार आंदोलनाला सुरूवात झाली असून प्रत्येक गावातील नागरिक तहसील कार्यालयात साखळी उपोषण करणार आहेत. बुधवारी आरक्षणाच्या मागणीवर खर्डा याठिकाणी एका तरूणांने शोले स्टाईल आंदोलन केले. यावेळी संबंधीत तरूण मोबाईल टॉवर चढला होता. पारनेर तालुक्यात आरक्षणाच्या मुद्यावर आजपासून समाज बांधव लाक्षणिक उपोषण सुरू करणार आहेत.
दरम्यान, सिध्देश्वर वाडी, देवसडे यासह काही ठिकाणी नेत्यांना गावबंदी करत शासकीय कार्यालयावर बहिष्कार टाकण्यात आला. नगरमध्ये काल सकाळी काही शिर्डीला सभेला जाणार्या एसटी बससे अडवून त्यातून नागरिकांना खाली उतरवण्यात आले. कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी असाच प्रकार घडला. यावेळी नागरिकांना बळजबरीने एसटी बसेसमध्ये बसवून नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्यांनी एसटीवर दगफेक करण्याचा इशारा दिल्यानंतर रिकाम्या एसटी बसेस कर्जत तहसील कार्यालयात आणण्यात आल्या.
कोपरगाव तालुक्यातील करंजी गावातील मराठा समाज आक्रमक झाला आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झालेल्या गावकर्यांनी राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष, असे बॅनर गावात लावण्यात आले आहेत.