
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
महाराष्ट्र अपार सामर्थ्य व अखंड सदभावनेचे केंद्र आहे. महाराष्ट्राचा विकास झाला तर भारताचाही विकास वेगाने होईल. 2014 च्या आगोदरच्या तुलनेत जी कामे झाली त्या तुलनेत या 10 वर्षात सहापट अधिक विकास कामे झाली. केंद्र सरकारने (Central Government) योजनांची अंमलबजावणी करताना गरीबांच्या कल्याणाला प्राधान्यक्रम दिला आहे. योजनांची यशस्वी अंमलबजावणी हाच खर्या अर्थाने सामाजिक न्याय आहे . आपला विकासाचा वेग दुप्पट झाला आहे. याच आधारावर 2047 पर्यंत भारतदेश विकसित राष्ट्र बनेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिली.
निळवंडे धरणाचे (Nilwande Dam) लोकार्पण, शिर्डी (Shirdi) संस्थानद्वारे निर्मित नवीन दर्शन रांग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन, साईबाबा शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण, अहमदनगर येथील आयुष हॉस्पिटलचे उद्घाटन, अहमदनगर येथील महिला व बाल रुग्णालयाचे भूमिपूजन, शिर्डी विमानतळ नवीन टर्मीनल बिल्डिंगचे भूमिपूजन यासह शासनाच्या विविध योजनांच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप आदी 14 हजार कोटी रूपयांच्या विकास कामांचा भुमिपुजन व लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते गुरूवारी शिर्डी येथे झाला.
प्रामुख्याने नगर जिल्ह्याच्या उत्तर भागाला वरदान ठरणार्या निळवंडे धरणाचे लोकार्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, कृषीमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री जान्हाजी सावंत, सहकारमंत्री अतुल सावे, कामगार मंत्री सुरेश खाडे, खा.डॉ. सुजय विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, आ. राम शिंदे, आ. मोनिका राजळे, आ.बबनराव पाचपुते, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. उन्मेश पाटील, खा. रक्षा खडसे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांना त्रिवार अभिनंदन, शिर्डीच्या पावन भूमिला माझे कोटी कोटी नमन. पाच वर्षापूवी साईबाबांच्या शताब्दी सोहळ्यानिमीत्त साईदर्शनाची संधी मिळाली होती, अशी भाषणाची मराठीत सुरवात करून पंतप्रधान मोदी म्हणाले, गरीबीतून मुक्ती करण्यासाठी केंद्र सरकार विविध योजनांव्दारे काम करीत आहे. या योजनांची अंमलबजावणी म्हणजेच खर्याअर्थाने सामाजिक न्याय आहे. त्यामुळेच आमच्या सरकारने गरीबांच्या कल्याणाला प्राधान्यक्रम दिला आहे. यासाठी आम्ही बजेटही वाढविले आहे. आज राज्यात 1 कोटी 10 लाख नागरीकांना आयुष्यमान कार्डचे वाटप होत असल्याने 5 लाख रुपयांच्या मोफत उपचारांची हमी या माध्यमातून मिळणार आहे.
छोट्या शेतकर्यांसाठी केंद्राप्रमाणेच राज्य सरकारनेही नमो किसान महासन्मान योजनेची केलेली सुरुवात हे महत्वपूर्ण असल्याचे स्पष्ट करुन, प्रधानमंत्री म्हणाले, आजपर्यंत फक्त शेतकर्यांच्या नावावर राजकारण केले गेले. निळवंडे सारखा प्रकल्प एवढ्यावर्ष रखडल्याचा उल्लेख करुन ते म्हणाले, आता हा प्रकल्प मार्गी लागल्याने शेतकर्यांना त्याचा लाभ होईल. परंतू जलसिंचन वाढविण्यासाठी बळीराजा जलसंजीवनी योजनेची सुरुवात सरकारने केली आहे. यामाध्यमातून राज्यातील 26 प्रकल्प पुर्ण करणे हा आमचा प्राधान्यक्रम असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
या बरोबरीनेच आवास योजनेच्या उभारणीसाठी 4 लाख कोटी रुपयांची तरतुद केली असून, पीएम स्वनिधी योजनेतून छोट्या व्यापार्यांना मदत करण्याबरोबरच आता पंतप्रधान विश्वकर्मा योजनेतून ग्रामीण भागातील कारागिरांनाही सरकार अर्थसहाय्य करीत आहे. यापुर्वी फक्त योजनांमध्ये लाखो आणि कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या येत होत्या. आता मात्र थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत असल्याने योजनांची अंमलबजावणी देशभरात यशस्वीपणे होत असल्याचे सांगुन सहकार चळवळीला सशक्त करण्यासाठी संपूर्ण देशभरात दोन लाख प्राथमिक सोसायट्या सुरु करण्याचे सरकारचे धोरण आहे. या माध्यमातून शेतकर्यांकरीता भांडार आणि कोल्ड स्टोअरेज सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्यांच्या माध्यमातून शेतकर्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरु झाले असून, आत्तापर्यंत 7 हजार 500 कंपन्या सुरु केल्या असल्याची माहीती त्यांनी दिली.