पंतप्रधान पीक विमा खरीप हंगामाचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग

खा. डॉ. विखे- कडिर्ले यांच्या पाठपुराव्याला यश
पंतप्रधान पीक विमा खरीप हंगामाचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 2019- 20 या हंगामाचा खरीप पिकांच्या पीक विमा तांत्रिक कारणामुळे रखडलेला होता. याप्रश्नी भाजपचे खा.डॉ. सुजय विखे पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक शिवाजीराव कर्डिले यांनी केंद्रीय कृषीमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले असून शेतकर्‍यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम वर्ग झाली आहे.

प्रलंबित असलेला शेतकर्‍यांची ही पीक विम्याची रक्कम शेतकर्‍यांना मिळाल्यास पुढील रब्बी हंगामाच्या कृषी निविष्ठांसाठी तरतूद करता येणार आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांच्या व्यथा थेट केंद्रीय कृषी कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्यासमोर मागील आठवड्यात दिल्ली येथे खा. डॉ. सुजय विखे व जिल्हा बँकेचे संचालक कर्डिले यांनी भेटून मांडल्या होत्या.

त्यावेळेस कृषिमंत्र्यांनी संबंधित पीक विमा कंपनीला तातडीने सूचना दिल्या होत्या. काल पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात साडे बारा हजार रुपयांपर्यंतचे अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 2019-20 च्या खरीप हंगामातील कपाशी आणि तूर या पिकासाठी पैसे जमा झाल्याने खा. डॉ. विखे पाटील यांनी केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांचे शेतकर्‍यांच्यावतीने आभार व्यक्त केले.

असा आहे लाभ

जिल्ह्यातील जामखेड 15 लाख 25 हजार, कर्जत 9 कोटी 79 हजार, शेवगाव 10 कोटी 74 लाख 68 हजार, पाथर्डी 1 कोटी 51 लाख 35 हजार, श्रीगोंदा 3 लाख 56 हजार, पारनेर 60 हजार, राहुरी 3 कोटी 83 लाख 30 हजार रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत जमा करण्यात आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com