जिल्हा उपनिबंधकांकडून परवानगी नसल्याने भूखंड लिलावास स्थगीत

भूखंड घोटाळ्याची रंगली चर्चा
जिल्हा उपनिबंधकांकडून परवानगी नसल्याने भूखंड लिलावास स्थगीत

पाथर्डी | तालुका प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समितीतील (Agricultural Produce Market Committee) भूखंड (Plot) वाटपाला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांची परवानगी नसल्याने परवानगी मिळेपर्यंत भूखंडाचे लिलाव स्थगित ठेवण्यात आला आहे. याबाबतची माहिती बाजार समितीचे सभापती बंन्सीभाऊ आठरे व सचिव दिलीप काटे यांनी दिली.

जिल्हा उपनिबंधकांकडून परवानगी नसल्याने भूखंड लिलावास स्थगीत
१० लाखासाठी भाडेकरूनेच केला घरमालकाच्या अपहरणाचा प्रयत्न, पण...

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने अधिकार नसतानाही बेकायदेशीरपणे भूखंड वाटपाचा घाट घातला आहे. मर्जीतल्यांना भूखंड देण्यासाठी इच्छुकांचे अर्ज व अनामत रक्कम स्वीकारली जात नाही. भूखंड वाटपाच्या लिलाव प्रक्रियेत सर्व इच्छुकांना सहभागी करून घ्यावे, अन्यथा लिलाव प्रक्रिया रद्द करावी या मागणीसाठी संचालक कुंडलिकराव आव्हाड, संदीप पठाडे, आम आदमीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड व गोरक्ष ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली इच्छुक व्यवसायिकांनी बाजार समितीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. बाजार समिती प्रशासना विरोधात आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली. खात्याच्या सूचनेनुसार लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली असून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांची परवानगी घेऊन व मार्गदर्शक सूचनांनुसार नवीन प्रक्रिया राबविण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, जिल्हा उपनिबंधकांची परवानगी नसतानाही लिलाव प्रक्रिया कशी ठेवली ? भूखंड गिळंकृत करण्यासाठी गुपचूप प्रक्रिया राबवली जाणार होती. मात्र, मध्येच भांडाफोड झाला. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करत बाजार समितीने बेकायदेशीर भूखंड वाटप केल्यास न्यायालयात जाऊ असा इशारा संचालक आव्हाड व पठाडे यांनी दिला आहे.

गेल्या अनेक दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे बहुचर्चित भूखंड वाटप वादात अडकले आहे. पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या आवारातील 7 रिक्त भुखंड, तिसगाव उपबाजार आवारातील 20 रिक्त भुखंड व 9 गाळे तसेच खरवंडी कासार उपबाजार आवारातील 4 रिक्त भुखंड भाडेपट्टयाने देण्यासाठी अटी व शर्तीच्या आधारे बाजार समितीने वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्दी केली होती. त्यानुसार काल (दि.20) लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार होती. लिलावात सहभागी होण्यासाठी बाजार समीती प्रशासनाकडून मुदतीत विहीत नमुन्यातील अर्ज व अनामत रक्कम जमा करून घेण्यास टाळाटाळ व अडवणुक केली जात असल्याची तक्रार करून भुखंड व गाळे लिलाव प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात यावे, अशी मागणी खरेदी विक्री संघाचे संचालक संदिप पठाडे व इतर आठ इच्छुकांनी सहायक निबंधक पाथर्डी यांचेकडे केली होती. याबाबत सहायक निबंधक यांनी संबंधितांच्या अर्जाचा उचित निर्णय घेऊन तसा अहवाल कळवावा, असे पत्र बाजार समितीला दिले होते. त्यामुळे आजच्या लिलाव प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

शुक्रवारी सकाळीच बाजार समितीचे संचालक आव्हाड, पठाडे, किसन आव्हाड, गोरक्ष ढाकणे, ज्ञानेश्वर सांगळे, अरविंद सोनटक्के, सौरभ दानापूर, बंडू लाहोटी यासह लिलावात सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या व्यापार्‍यांनी बाजार समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन करत लिलाव प्रक्रियेत सहभागी करून घ्या अन्यथा प्रक्रिया रद्द करा अशी मागणी केली. बाजार समितीचे भूखंड लाटण्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर तक्रारी झाल्या. जिल्हा उपनिबंधकांनी याची दखल घेऊन तालुका उपनिबंधकांना चौकशी अधिकारी म्हणून नेमले. चौकशी अधिकार्‍यांनी चौकशी करून जिल्हा उपनिबंधकांना अहवाल कळवला आहे. याबाबत संचालकांचे म्हणणे मागवले होते. सहा संचालकांनी विरोधात मत नोंदवले. सचिव यांनी खात्यात पैसे जमा झाल्याचे रेकॉर्ड नसल्याबाबत मत नोंदवले आहे. जिल्हा उपनिबंधकांची परवानगी नसतानाही आता गुपचूप भूखंड लाटण्याचा घाट घालण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com