पिंपरी निर्मळ सोसायटी निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीची रंगीत तालीम!

पिंपरी निर्मळ सोसायटी निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीची रंगीत तालीम!

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील सुरू असलेली सेवा सोसायटीची निवडणूक सहा महिन्यांनंतर होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचे मानले जात आहे. ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावयाचा रस्ता सोसायटीच्या मार्गाने जात असल्याने येथील तिनही राजकीय गटांनी सोसायटी ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे.

राहाता तालुक्यातील गणेश परीसरातील पिंपरी निर्मळ गावचे राजकीयदृष्टीने अनन्य साधारण महत्त्व आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघातील प्रवरा परीसर व गणेश परीसर यांना जोडणारा दुवा म्हणून पिंपरी निर्मळ गावाकडे पाहिले जाते. सध्या येथील सेवा सोसायटीची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा ग्रामविकास मंडळ व जनसेवा मंडळ या दोन गटांबरोबर महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांना मानणार्‍या शेतकरी मंडळाचा तिसरा पॅनल प्रथमच निवडणुकीत आपले नशिब आजमावत आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यांनंतर येत्या डिसेंबरमध्ये पिंपरी निर्मळ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे.

परीसरातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण पिंपरी निर्मळ ग्रामपंचायतीवर राजकीय वर्चस्व मिळवायचे असेल तर प्रथम सोसायटी ताब्यात असणे किंवा निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामस्थांना सामोरे जाणे गरजेचे असल्याने येथील तिनही गटांचे प्रमुख सेवा सोसायटी निवडणुकीत शड्डु ठोकून आहेत. आ. विखे पाटलांच्या दोन्ही गटांना मागील निवडणुकांमध्ये राजकीय अनुभव असल्यामुळे होऊ घातलेली निवडणूक त्यांच्यासाठी काहीशी रूळलेली निवडणूक सिद्ध होत आहे. मात्र शेतकरी मंडळाच्या माध्यमातून प्रथमच राजकीय आखाड्यात उतरलेल्या तिसर्‍या मंडळानेही आपली राजकीय चुणूक दाखवून ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे सेवा संस्थेची होऊ घातलेली निवडणूक तिनही गटांसाठी डिसेंबरमध्ये होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीची रंगीत तालीम असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रातून होत आहे.

कार्यकर्ते सोसायटीला, नेते ग्रांमपचायतीला

सेवा सोसायट्यांचे कार्यक्षेत्र मर्यादीत आहे. बँकेकडून शेतकर्‍यांना शेती कर्जाचे वाटप होते. त्यामध्ये वाटप व वसुली एवढाच रोल सेवा सोसायटीचा असतो. सर्व ऑनलाईन झाल्याने संचालक मंडळ सयाजीराव झाल्याचे चित्र आहे. याउलट ग्रामपंचायतीला शासनाच्या विविध योजनांचा निधी असतो. शासकीय निधीतून घरकुल व तत्सम वैयक्तीक लाभांच्या योजना असतात, काम करण्याला संधी असते. त्यामुळे गावातील स्वतःला श्रेष्ठ समजणारे गाव पुढारी सेवा सोसायट्यांमध्ये कार्यकर्त्याना संधी देऊन स्वतः मात्र ग्रामपंचायतीसाठी मागे थांबत असल्याचे चित्र आहे.

Related Stories

No stories found.