पिंप्रीलौकी अजमपूर येथे अतिवृष्टीमुळे 75 फुटाची विहीर ढासाळली

शेतकर्‍यांचे नुकसान
पिंप्रीलौकी अजमपूर येथे अतिवृष्टीमुळे 
75 फुटाची विहीर ढासाळली

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील पिप्रीं-लौकी अजमपूर येथे दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकाच्या नुकसानीसह 75 फूट खोल सामुदायिक विहीर ढासळल्यामुळे येथील चार शेतकर्‍यांचे मोठे अर्थिक नुकसान झाल्याने त्या शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. नुकताच या पडलेल्या विहीरीचा पंचनामा करण्यात आला असून या शेतकर्‍यांना अर्थिक भरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

यावर्षी मधल्या काळात गायब झालेला पाऊस अतिवृष्टीच्या निमित्ताने परतला खरा पण, त्याने मात्र कहरच केला. एकीकडे शेतातील नापिकी, दुष्काळ व आता अतिवृष्टी यामुळे पिकांसह विहिरींनाही याचा फटका बसला आहे. लहरी पावसाच्या थैमानाने हातावर पोट असलेल्या अनेकांना आपले संसार चालवणे सुध्दा जिकरीचे झाले आहे. त्यामुळे आधिच अर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांचे अतिवृष्टीने कंबरडे मोडल्याचे चित्र आहे.

पिप्रीं-लौकी अजमपूर येथे मागील दोन ते तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील भागुबाई चांगदेव गिते, महादेव भिवराज गिते, कांताबाई बबन लावरे, पुंजा चिमाची लावरे यांची गट नंबर 103/6 मध्ये असलेली 75 फुट खोल सामुदायिक विहीर बुजली गेली आहे. या शेतकर्‍यांच्या शेतात मका, घास व सोयाबीन अशी पिके उभी असून त्याच्या होणार्‍या नुकसानीमुळे मोठे अर्थिक संकट निर्माण होण्याची भिती निर्माण झाली आहे.

नुकसान झालेल्या विहीरीचा पंचनामा कामगार तलाठी मुन्तोडे यांनी केला आहे. यावेळी गणपत साहेबराव दराडी, शेवराज पाडुरंग गिते, सुभाष चंद्रभान गाडेकर, संजय भाऊसाहेब गिते, दगडु पाडुरंग लावरे, संतोष चांगदेव गिते, सुरेश महादेव गिते, लहानु पुंजा लावरे, लक्ष्मण निव्वुत्ती गिते, उपसरपंच सुनील लहानु दातीर आदि उपस्थित होते.

या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अर्थिक भरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com