पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal
पावसाळ्याचे पावणे चार महिने संपत आले आहेत. मात्र या कालखंडात राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परीसरात दमदार पाऊस झालेला नाही. या भागात सरासरीच्या तुलनेत अवघा 26 टक्के म्हणजेच 143 मीमी पाऊस झाला आहे. अत्यल्प पावसावर शेतकर्यांनी पेरणी केली. ती पिकेही पावसाअभावी जळाली आहेत. जिरायती टापु असल्याने शेतीला जोड व्यवसाय म्हणून केला जाणारा दूध व्यवसाय चार्याअभावी संकटात सापडला असून चारा डेपो सुरू करावा, अशी मागणी केली जात आहे.
बाभळेश्वर मंडळातील पिंपरी निर्मळ परीसरात यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. कमी ओलीवर पेरण्या झाल्या. यासाठी हजारो रुपये खर्च करून बी-बियाणे, खते विकत घेतली. त्यावर पुन्हा तणनाशके, किटकनाशके फवारणी केली. मात्र दमदार एकही पाऊस न झाल्याने पिके जळाली आहेत. पावसाळ्याचे पावनेचार महिने संपले आहेत. या चार महिन्यात दरवर्षी 500 मीमी च्या वर पाऊस होतो. यावर्षी अद्याप अवघा 143 मीमी पाऊस झाला आहे. दुष्काळी टापू असल्याने शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व पोल्ट्री व्यवसाय केला जातो. गावात जवळपास 5 हजार लहान मोठे पशुधन तर दीड लाख कोबड्या आहेत. पावसाअभावी चार्याचे संकट तयार झाले आहे. विकतचा चारा घेवून दूध धंदा तोट्यात जात आहे.
शासनाने दुर्लक्ष केल्यास शेतकरी मोडकळीस येणार आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दुष्काळी उपाययोजना करून पिंपरी निर्मळ व परिसरासाठी चारा डेपो सुरू करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
निळवंडेचे आवर्तन चालू महिन्याच्या शेवटी सुटणार असल्याची चर्चा आहे. त्यातून परिसरातील पाझर तलाव, ओढे, नाले भरल्यास परिसरातील पशुधनासाठी पिण्याचे पाणी व चारा पिकांसाठी मोठा आधार होऊ शकतो.