पिंपरी निर्मळ ग्रामपंचायत निवडणूक प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

पिंपरी निर्मळ ग्रामपंचायत निवडणूक प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळसह बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे लवकर या गावांमध्ये निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. सरपंचपद जनतेतून असल्याने निवडणुका लक्षवेधी होणार आहेत.

जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायती तसेच नव्याने स्थापित होणार्‍या ग्रामपंचायती व सन 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होवू शकणार्‍या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुंकासाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ, दहेगाव, निमगाव कोर्‍हाळे, कोर्‍हाळे, धनगरवाडी, दुर्गापूर, वाकडी, दाढ बु., कनकुरी, रुई, पुणतांबा, चितळी या गावांचा समावेश आहे.

तहसिलदार यांनी 30 जानेवारी 2023 पर्यंत गुगल अर्थचे नकाशे अंतिम करणे, 7 फेब्रुवारी पर्यत संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करुन प्रभाग पाडणे व सीमा निश्चित करणे, 15 फेब्रुवारी पर्यंत तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारुप प्रभागरचनेची तपासणी करणे, 21 फेब्रुवारी सदर समितीने प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसाठी सादर करणे, 30 मार्च जिल्हाधिकारी यांनी प्रारूप प्रभाग रचनाची संक्षिप्त तपासणी करणे व त्यात आवश्यक दुरुस्त्या करणे व मान्यता देणे.

17 मार्च ते 24 मार्च दरम्यान नागरीकांना यावर हरकती व सूचना दाखल करता येतील. प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर उपविभागीय अधिकारी यांनी 6 एप्रिलला सुनावणी घ्यावी व जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगास सादर करणे व राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी यांनी 25 एप्रिल 2023 ला प्रसिध्दी करणे असा कार्यक्रम आहे. यानंतर वार्डनिहाय आरक्षणे सोडती, वार्डनिहाय मतदार याद्या व प्रत्यक्ष निवडणुक असा कार्यक्रम असणार आहे. प्रत्यक्ष निवडणुकीसाठी आणखी काही महीन्याचा अवधी जाणार आहे. मात्र निवडणुकीची पहिली पायरी असलेली प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरु झाल्याने गावागावातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होणार आहे.

कोर्‍हाळे, दहेगाव कोर्‍हाळे, निमगाव कोर्‍हाळे, धनगरवाडी, दुर्गापूर, वाकडी या ग्रामपंचायतींच्या विद्यमान कमिटीची मुदत जानेवारीमध्ये तसेच दाढ बु., पिंपरी निर्मळ यांची फेब्रुवारीत तर कनकुरी, रूई यांची मुदत एप्रिलमध्ये संपणार आहे. मात्र तोपर्यंत प्रभाग रचनेचाच कार्यक्रम असल्याने प्रत्यक्ष निवडणुकीस वेळ लागणार आहे. मुदतीनंतर या ग्रांमपंचायतीवर प्रशासक येण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com