कोणत्या कारणावरून जिरायत भागात उसळतेय संतापाची लाट

कोणत्या कारणावरून जिरायत भागात उसळतेय संतापाची लाट

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

पन्नास वर्षापासून रखडलेल्या निळवंडेचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी गेल्या 20 वर्षापासून संघर्ष करणार्‍या व निळवंडे प्रश्न जागृत ठेवणार्‍या निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या कार्यकर्त्यावर व खा. सदाशिव लोखंडे यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने जिरायत शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लोणी पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी चंद्रभान शेळके, बाळासाहेब घोरपडे आदी शेतकर्‍यांनी केली आहे.

निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी गेल्या 50 वर्षांपासून धरणाच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मुख्य कालव्यांचे काम प्रगतिपथावर आहे. पिंपरी निर्मळपासून निळवंडेच्या अंत्य कालवा सुरू होतो. मात्र दोन कंत्राटदारांच्या वादामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अंत्य कालव्याचे काम बंद होते. खा. लोखंडे यांनी कालव्याच्या पिंपरी निर्मळ शिवेच्या ठिकाणी जाऊन ज्या कंत्राटदाराला काम करण्याचे टेंडर आहे त्यानेच काम सुरू करावे अशा सूचना करून रखडलेले काम सुरू करून दिले.

यावेळी कृती समितीचे सदस्यही तेथे हजर होते. मात्र लोणी पोलिसांनी याबाबत कोणतीही खातर जमा न करता खा. लोखंडे व कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर जमावबंदीचे गुन्हे दाखल केले. ज्यांनी गेल्या 20 वर्षांपासून निळवंडे प्रश्नासाठी ठेचा खाल्ल्या, संघर्ष केला, यापुर्वीही स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतले मात्र निळवंडेचा प्रश्न जिंवत ठेवला अशा समितीच्या सदस्यांवर तसेच ज्या खासदारांनी दिल्लीपासून मुंबईपर्यंत निळवंडेच्या निधीसाठी व इतर मान्यतांसाठी संघर्ष केला. अशा लोकप्रतिनिधीवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

यामुळे जिरायत टापूतील लाभधारक शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली असून चोर सोडून संन्याशाला फाशी अशी भावना शेतकर्‍यांमध्ये तयार होत आहे.पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी चंद्रभान शेळके, बाळासाहेब घोरपडे आदी शेतकर्‍यांनी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com